पिंपरी : भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याचे १२०० रुपयांचे तिकीट १२ हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गहुंजे येथे शुक्रवारी सामना झाला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने रावेत येथील मुकाई चौकात बुधवारी (दि. १८) रात्री ही कारवाई केली. रवी लिंगप्पा देवकर व अजित सुरेश कदम, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना तिकिटे पुरवणारा त्यांचा साथीदार युनुस शेख याच्या विरोधात देखील पोलिसांनी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट विश्वचषकातील भारत विरुद्ध बांगलादेश सामना गुरुवारी झाला. त्यासाठी क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार होणार नाही, याची खबरदारी घेतली. साध्या वेशातील पोलिस काही दिवसांपासून गहुंजे मैदान परिसरात गस्तीवर आहेत. दरम्यान, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली की, रावेत येथील मुकाई चौकात काही दलाल क्रिकेट सामन्याची तिकिटे जास्त दराने विकत आहेत. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री सापळा लावून रवी देवकर आणि अजित कदम यांना ताब्यात घेतले. दोघांकडे भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याची १२०० रुपये दराची पाच तिकिटे आढळली. यातील एक तिकीट ते १२ हजार रुपयांना विकत होते. पोलिसांनी पाच तिकिटे, ३८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, सात हजार रुपयांची रोकड, असा एकूण ५१ हजारांचा ऐवज जप्त केला. रवी देवकर आणि अजित कदम यांना त्यांचा साथीदार युनुस शेख याने तिकिटे पुरवल्याचे तपासात समोर आले.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, पोलिस अंमलदार सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
काळ्या बाजारातून तिकिट खरेदी-
गहुंजे मैदानात विश्वचषकातील पाच सामने होणार आहेत. त्यातील पहिला सामना गुरुवारी झाला. भारत विरुद्ध बांगलादेश या संघांमधील या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी होती. या मैदानावरील उर्वरित चार सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या सामन्याचा समावेश नाही. त्यामुळे गुरुवारच्या सामन्याच्या तिकिटांना मागणी होती. जास्तीचे पैसे देऊन काळ्याबाजातारातून तिकिटे खरेदी केल्याचे अनेकांनी सांगितले.