लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी (जि. पुणे) : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निंगच्या उदयानंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील. केवळ साक्षर होणे पुरेसे नाही तर, एआय साक्षर होणे गरजेचे आहे. आपण विश्वगुरू होतो आणि मला विश्वास आहे की, भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी पिंपरीत सोमवारी सांगितले. डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाच्या चौदाव्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल बैस बोलत होते.
एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करा
राज्यपाल बैस म्हणाले, ‘‘येत्या -२०३० पर्यंत मशीन लर्निंगच्या माध्यमातून ४० ते ८० कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात, असा मॅकेन्झिचा अहवाल सांगतो. यातल्या ३७.५ कोटी लोकांना त्यांच्या कामाची श्रेणी पूर्णत: बदलावी लागणार आहे. एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात केल्यास भारतीयांना एआय आणि मशीन लर्निंगमुळे होणारऱ्या बदलांना सामोरे जाता येईल. एआयच्या आगामी युगात निरंतर शिकत राहावे लागणार आहे, असेही राज्यपाल बैस यांनी सांगितले.