पिंपरी : नाट्य, लोककला, गायन क्षेत्रातील तैलचित्रे आता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या अंतर्गत भिंतीवर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नव्यानेच रसिकांच्या सेवेत आलेल्या या प्रेक्षागृहाची शोभा अधिकच वाढणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आहे. या प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे काम नुकतेच संपले आहे. प्रेक्षागृह नूतनीकरण कामासाठी नेमणूक करण्यात आलेल्या वास्तुविशारदातर्फे ड्रॉर्इंग आणि डिझाईन केली आहे. त्यानुसार प्रा. मोरे प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणासाठी २० कोटी रुपये इतका खर्च आला आहे. नूतनीकरणानंतर हे प्रेक्षागृह रसिकांच्या सेवेसाठी रुजू झाले आहे. या प्रेक्षागृहाच्या अंतर्गत भागातील भिंतींवर नाटक, लोककला, गायन आदी क्षेत्रांतील तैलचित्रे लावून प्रेक्षागृहाची शोभा वाढविण्यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. त्यांनतर त्यांनी चित्रकार सुनील शेगावकर आणि प्रवीण गांगुडे यांच्याशी २२ आॅक्टोबर २०१८ रोजी चर्चा केली. त्यानंतर चित्रकार शेगावकर यांनी आपल्याकडील काही चित्रे दाखविली. त्यावर आयुक्तहर्डीकर आणि अन्य अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या विषयांवर चारचित्रे काढून देण्याचे शेगावकर यांनी मान्य केले.चित्राच्या फ्रे मसह सुमारे आठ फूट बाय पाच फूट इतक्या आकाराचे एक तैलचित्र असणार असून, प्रति चित्र अडीच लाख रुपये (जीएसटी व अन्य करांसह) इतका खर्च येईल, असे चित्रकार शेगावकर यांनी सांगितले. त्यामुळे शेगावकर यांच्याकडूनच चार तैलचित्रे रेखाटून घेण्यात येणार असून, त्यासाठी दहा लाख रुपये इतका खर्च येणार आहे.४प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या सीमाभिंतीवर अंतर्गत भागामध्ये ग्राफिकल पेंटिंग म्यूरल रेखाटण्याचे काम प्रसिद्ध चित्रकार प्रवीण गांगुर्डे यांच्यावर सोपविण्यात आले आहे. गांगुर्डे यांचा या क्षेत्रातील सुमारे सत्तावीस वर्षांचा अनुभव असून, हे पेंटिंग म्यूरल रंगविण्यासाठी प्रति चौरस फूट ६०० रुपये (जीएसटी व अन्य करांसह) असा दर गांगुर्डे यांनी सादर केला आहे. प्रेक्षागृहातील प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता सुमारे ६० मीटर बाय २ मीटर इतका सीमाभिंतीच्या पृष्ठभागावर काम करणे शक्य आहे. त्यानुसार १२० चौरस मीटर अर्थात १२९१ चौरस फूट सीमाभिंतीवर ग्राफिकल पेंटिंग म्यूरल चित्रकार प्रवीण गांगुर्डे रेखाटणार आहेत. हे पेंटिंग म्यूरल पाच वर्ष टिकणार असून, त्यावर लँकर कोटिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी ७ लाख ७४ हजार ६०० रुपये इतका खर्च येणार आहे. स्थायी समितीच्या सभेत या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.