विशाल विकारी ,लोणावळासंतसरिता इंद्रायणी नदीला उगमस्थानातच म्हणजे लोणावळा शहरातच जलपर्णीचा विळखा पडला आहे. शहरातील गटारे व ड्रेनेज नदीपात्रात सोडण्यात आल्याने शहरातून वाहणाऱ्या या नदीला अक्षरश: गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्या नदीचे पाणी तीर्थ म्हणून भाविक प्राशन करतात, तसेच कामशेत, तळेगाव या शहरांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनाजिच्या पात्रातील पाण्यावर राबविल्या गेल्या आहेत, अशा पवित्र नदीस उगमस्थानाजवळच अवकळा आली आहे.लोणावळ्याजवळील कुरवंडे गावालगतच्या नागफणी डोंगरातून इंद्रायणीचा उगम होतो. उगमाजवळच बांधलेल्या लोणावळा धरणाच्या भिंतीपासून खरे तर इंद्रायणीला प्रारंभ होतो. शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या इंद्रायणीत शहरातील सर्व गटारे व ड्रेनेज लाईन सोडण्यात आल्याने नदीपात्र पूर्णत: प्रदूषित झाले आहे. मोठ्या प्रमाणात मच्छरांचा प्रादुर्भाव पात्रालगत पाहायला मिळतो. नदीकाठच्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. उगमापासून सर्वत्र पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली असल्याने नदीपात्रे हिरव्या गालिचासारखी दिसत आहेत. दर वर्षी नगर परिषद इंद्रायणी नदीपात्राची स्वच्छता व गाळ काढण्याच्या कामासाठी, तसेच जलपर्णी काढण्याच्या कामासाठी लाखो रुपये खर्च करते. मात्र, शहरातील गटारे व ड्रेनेजच या पात्रात सोडली असल्याने पात्राच्या स्वच्छतेकरिता पावसाळ्याच्या तोंडावर केला जाणारा खर्च हा व्यर्थ जात आहे. नदीपात्रांच्या संगोपनासाठी इंद्रायणी गार्डनलगत सीमाभिंत बांधण्यात आली आहे. नगर परिषदेने आतापासूनच नदीपात्रातील गाळ व जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात केल्यास जलपर्णीची मुळे ही तप्त उन्हामुळे जळून जातील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. जलपर्णीप्रमाणे कचरा हादेखील नदीचे प्रदूषण करीत आहे. अनेक वेळा नागरिक नदीपात्राच्या कडेला इंद्रायणी पूल व नगर परिषद रुग्णालयासमोरील पुलावरुन कचरा सर्रास प्लॅस्टिक बॅगमध्ये भरुन पात्रात टाकतात. त्यामुळे नदीचे मुळात प्रदूषित झालेले पात्र कचरामय झाले आहे.
इंद्रायणी नदीला उगमस्थानीच जलपर्णीचा विळखा
By admin | Published: April 17, 2017 6:42 AM