- विश्वास मोरे
पिंपरी :इंद्रायणी नदीच्या तीरावर भागवत धर्मातील वारकरी संप्रदायातील मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. त्यावर संत तुकाराम महाराजांनी कळस चढविला. पर्यावरणाचे महत्त्व वारकरी संतांनी सांगितले. मात्र, देहूगाव ते आळंदीपर्यंतच्या नदी मार्गावर नागरीकरण वाढले आहे. महापालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतींचे मैला शुद्धिकरणाचे प्रकल्प अपयशी ठरल्याने अजूनही सांडपाणी थेट नाल्यामधून इंद्रायणीत मिळत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची गंगा असणारी तीर्थरुपी इंद्रायणी आता गटारगंगा झाली आहे.
आषाढीवारी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पायी पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. देहू-आळंदीतून आलेला भक्तीचा प्रवाह थेट चंद्रभागेशी एकरूप होतो. मात्र, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आषाढीवारीच्या निमित्ताने वारकऱ्यांची माई असणाऱ्या इंद्रायणी नदीची ‘लोकमत’ प्रतिनिधीने गुरुवारी पाहणी केली. त्यातून इंद्रायणी नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले.
गावांतील सांडपाणी थेट नदीत
देहूगाव : देहूगावची लोकसंख्या चाळीस हजारांच्या आसपास आहे. तर गावातील मैला सांडपाणी आणि सांडपाणी वाहून जाण्यासाठी वाहिन्या टाकल्या आहेत. तर मैलापाणी प्रक्रिया करण्यासाठी गायराणवर मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारले आहे. त्याची दुपारी पाहणी केली असता, तो बंद होता. तर हा प्रकल्प सकाळी सुरू असल्याचे तेथील व्यवस्थापकांनी सांगितले. गावातील दोन नाल्यांतील पाणी थेट नदीत जाताना दिसून आले. तसेच येलवाडी आणि इतर गावांतील सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे दिसून आले.
मैलाशुद्धीकरण केंद्र १०० टक्के नाही कार्यान्वित ...
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इंद्रायणी नदीवर चिखलीत १६ दशलक्ष लिटरचे दोन शुद्धिकरण केंद्र व चऱ्होलीतील चाळीस दशलक्ष लिटरचा एक आणि वीस दशलक्ष लिटरचा एक असे दोन एसटीपी प्लांट आहेत. त्यांचे पाणी १०० टक्के प्रक्रिया होत नसल्याचे दिसून आले. शहरात सिंटेल बंधारा, तळवडे-चाकण रस्ता, तळवडे स्मशान भूमी, चिखली माई पूल, शेलारवस्ती तळवडे, मोशी टोलनाका, सस्तेवस्ती बंधारा, डुडुळगाव स्मशानभूमी, आळंदी आणि चऱ्होली स्मशानभूमी येथील नाल्यांतील सांडपाणी थेट नदीत जात आहे.