पिंपरी : कामगार कायद्यातील बदल आणि कामगारविरोधी आर्थिक धोरणाच्या विरोधात पुकारलेल्या बुधवारच्या संपात उद्योगनगरीतील सर्वच कामगारवर्ग सहभागी होणार आहे. सरकारी व खासगी आस्थापना व संस्थांनी संपाला पाठिंबा दिल्याने कामगारनगरीतील सर्वच व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. संपातून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालय नियमितपणे सुरू राहणार आहेत. कामगार कायद्यात करण्यात येणारे बदल, सर्वच क्षेत्रांत वेगात होत असलेले खासगीकरण आणि असंघटितांच्या सामाजिक सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष या विरोधात देशातील सर्वच कामगार संघटनांनी एकत्रित येऊन संप पुकारला आहे. पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीने हा संप जाहीर केला आहे. संपात औद्योगिक, महापालिका, पोस्ट, संरक्षण, बीएसएनएल, वीज मंडळ, बॅँकिंग, विमा क्षेत्रातील कामगार, तसेच माथाडी, हमाल, असंघटित, मोलकरीण, कंत्राटी कामगार सहभागी होणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच उद्योग बंद राहणार आहेत. काही ठिकाणी कामगार धरणे धरून निदर्शने करणार आहेत. कामगारांचा ‘जवाब दो’ हा मोर्चा पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून निघून वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त कार्यालय येथे पोहोचणार आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून या ठिकाणी आलेल्या कामगार रॅली तेथे एकत्रित होतील. तेथून पदयात्रा जुन्या जिल्हाधिकारी कचेरीवर नेण्यात येणार आहे. भारतीय लष्करी संरक्षण क्षेत्रातील ४१ सुरक्षा उत्पादन कारखाने, ५२ प्रयोगशाळा, एमईएस, वर्कशॉप, डेपो आदी आस्थापनांतील सुमारे ४ लाख संरक्षण कामगार संपात सहभागी होणार आहेत, अशी माहिती आॅल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशनचे (एआयडीईएफ) सचिव सी. श्रीकुमार यांनी दिली. (प्रतिनिधी)
उद्योगनगरी होणार आज ठप्प!
By admin | Published: September 02, 2015 4:16 AM