पिंपरी : जर मी गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमच्यासमोर उद्योगमंत्री म्हणून बसलो नसतो. गुवाहाटीला गेलो म्हणूनच मी उद्योगमंत्री झालो, असे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवड येथे केले.
मोशी येथे लघुउद्योजकांतर्फे शनिवारी (दि. १९) उद्योजक मेळावा झाला. त्यावेळी सामंत बोलत होते. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील, आमदार महेश लांडगे, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्रातील उद्योग नक्की कोणामुळे राज्याबाहेर गेलेत, हे सांगायची गरज नाही. तळेगावची जागा ही इको-फॉरेस्ट झोनमध्ये आहे. त्यामुळे वेदांता-फॉक्सकॉन सारखा प्रोजेक्ट राज्याबाहेर गेला. त्यासोबतच एअरबस, सॅफ्रॉन असे प्रकल्प बाहेर गेले. त्यांना महाविकास आघाडी जबाबदार आहे. प्रशासकीय कामकाजात धोरणात्मक निर्णय येणे गरजेचे आहे. एमआयडीसीत मूलभूत व आवश्यक त्या सुविधांची वानवा आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये काम करणारी लोकं आहेत. त्यामुळे लघुउद्योजकांवर अन्याय होऊ देणार नाही.
राहुल गांधींची फिटनेस यात्रा....
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नसून ही त्यांची फिटनेस यात्रा आहे. त्यांनी आधी नीट अभ्यास करावा व त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलावे. एखाद्या स्वातंत्र्यवीराबद्दल इतक्या खालच्या पातळीवर बोलणे चुकीचे आहे, असेही सामंत म्हणाले.