नेहरूनगर : पिंपरी-चिंचवड महापालिका व बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आॅफ खडकी यांच्या वतीने येथील एचए मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, हे प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांनी सैन्यदलातील क्षेपणास्त्रासह विविध शस्त्रांची पाहणी करून माहिती घेतली.प्रदर्शनाचे उद्घाटन मेजर जनरल प्रीथी सिंग, ब्रिगेडीयर धीरज मोहन, कर्नल रामा स्वामी, कर्नल राजविंदर सिंग, लेफ्टनल कर्नल के. के. गिरी, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहायक आयुक्त मनोज लोणकर, सहआयुक्त दिलीप गावडे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा अश्विनी जाधव, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षारक्षक मेजर उदय जरांडे, नगरसेविका सुजाता पालांडे, सैन्य दलातील अधिकारी आदी उपस्थित होते. या वेळी आकाशात तिरंगी फुगे सोडून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.प्रदर्शनात टॅन्क ट्रोलर, टी ७२ टॅन्क व अँटी एअर क्राफ्ट, रडार, ४० एमएम ग्रेनेड लॉन्चर, रॉकेट लॉन्चर, आॅटोमेटिक ग्रेनेड लॉन्चर, इंसास रायफल, लेझर गन, एके ४७, बुलेट पू्रफ मोटार, पूल तयार करणारे वाहन, जमिनीखालील बॉम्ब नष्ट करणारे टँक, बॉम्बशोधक, टेलीस्पॉकिक अन्युपेटर, आरोही दक्ष, रेडीओ सेट, सेटलाईन यंत्र, जगात कोणालाही कधीही कोठेही तातडीने संपर्क करणारे इनमार्स्ट यंत्र, रेडीओ रीलो मोटार, फोक्सरे, बेवारस वस्तूंमध्ये कुठली वस्तू आहे याचा शोध घेणारे यंत्र, पाच किलोमीटर लांबपर्यंत रात्रीच्या वेळी अचूकपणे व्यक्ती दिसणारा कॅमेरा, मोबाइल कम्युनिकेशन मोटार, क्रेन, नाव, वाळवंटात रस्ता तयार करणाºया लोखंडी पट्ट्या, पाणी उपसा व पाणी लांबपर्यंत पोहचवणारे यंत्र अशी विविध प्रकारची यंत्र, क्षेपणास्त्र, शस्त्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारचे सैन्य दलाचे प्रदर्शन भरवण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी याचा आनंद व्यक्त केला. १२ आॅगस्टला नागरिकांसाठी सायंकाळी साडेसहा ते आठ या दरम्यान लष्कराच्या कामावर प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार असून, या प्रात्यक्षिकांमध्ये विविध मार्शल आटर््सचाही समावेश असणार आहे.पहिल्याच दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शाळा, महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सैन्यदलातील कामकाज कसे काम चालते, युद्ध कसे केले जाते, युद्धामध्ये कुठले शस्त्र कुठे कसे वापरले जाते, याची माहिती संबंधित जवानांकडून घेऊन अनेक क्षेपणास्त्रे, शस्त्रे हाताळून त्यासमवेत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला.प्रदर्शनात असलेल्या सैन्य दलातील विविध क्षेपणास्त्र, शस्त्रांची पाहणी, हाताळणी करून शस्त्रांची माहिती घेतली. आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हर हर महादेव..., गोंधळ मांडला भवानी... या गाण्यावर नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत सादर केले.
विद्यार्थ्यांनी घेतली शस्त्रांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 2:37 AM