पिंपरी : हैद्राबाद येथील अत्याचाराच्या घटनेनंतर पिंपरी -चिंचवड पोलिसांकडून शहरातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षा आढावा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक सोमवारी (दि. ९) पोलीस आयुक्तालयात झाली. महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी तयार केलेल्या आराखड्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. हैद्राबाद येथील अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे. तसेच महाराष्ट्रातही बाललैंगिक अत्याचाराचे काही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी महिलांच्या सुरक्षेवर भर दिला आहे. महिला सुरक्षीततेच्या दृष्टीने मुलभूत सुविधांचा आढावा या वेळी घेण्यात आला. शहरातील निर्जन स्थळांवर ह्यवॉचह्ण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पुरेशा प्रकाशासाठी पथदिवे उभारण्यात येणार आहे. रिक्षांवर महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक तसेच महिलांचा सन्मार करण्यासाठी एक सूविचार नमूद करण्यात यावा, त्याबाबत वाहतूक विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ओला, उबेर यांसारखी खासगी प्रवासी कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येईल. या प्रतिनिधींना बैठकीत महिला सुरक्षेविषयी सूचना देण्यात येतील. लैंगिक अत्याचाराचे प्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी लैंगिक अत्याचाराचे तांत्रिक गुन्हे वगळता इतर गुन्ह्यांतील आरोपींची यादी करण्यात येईल. एकापेक्षा जास्त लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर पोलिसांकडून ह्यवॉचह्ण ठेवण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाणार आहे. महिलांना भयमुक्त वातारणासाठी शहरात पोलिसांकडून गस्त वाढविण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
...............महिलांच्या सुरक्षेसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आढावा समितीची स्थापना केली आहे. यात स्थानिक पातळीवरील यंत्रणांचा सहभाग असून, महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. - संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त, पिंपरी - चिंचवड