पिंपरी - कुत्र्याला टेरेसवरून फेकून मारल्याची घटना ताजी असतानाच कुत्र्याला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार सांगवी येथे उघडकीस आला आहे. तसेच एका कुत्र्याचा व दोन कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
विनोद राजन मुरार (वय ५०, रा. पिंपळे गुरव) यांनी याबाबत सांगवी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद मुरार यांच्याकडील पाळीव कुत्रा जखमी होऊन व तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत रविवारी त्यांच्या घरासमोर आला. त्यानंतर कुत्रा दगावला. त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या कुत्र्याचा मुरार यांनी शोध घेतला. त्यावेळी दुसरा कुत्रा पवना नदी परिसरात आढळून आला. एका पोत्यामध्ये घालून त्या कुत्र्याला पेटविण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे मुरार यांनी लागलीच पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दोन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तसेच दोन कावळेही मृतावस्थेत आढळून आले. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृत कुत्र्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविण्यात आले. कुणीतरी अज्ञात व्यक्तीन खाद्यपदार्थांतून विषप्रयोग केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. तसेच तक्रारदारांनी फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे उपनिरीक्षक माने यांनी सांगितले.