पिंपरी : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. रघु धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर, संदीप मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सुलोचना आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी (दि.१२) दुपारी पावने दोनच्या दरम्यान तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर किशोर आवारे यांच्यावर चार जणांनी गोळीबार करत कोयत्याने वार केले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. आरोपींच्या शोधासाठी पोलिसानी पथके रवाना केली होती. आरोपींना खंडणी विरोध पथक तसेच युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले.
मावळ तालुक्यातील युवा नेते आणि उद्योजक किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगरपालिका कार्यालय समोर शुक्रवारी दुपारी हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी गोळीबार करत तसेच कोयत्याने डोक्यावर वार केले. निपचीत पडल्यानंतरही हल्लेखोर आवारे यांच्यावर वार करत होते. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मावळ परिसरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मावळ परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी वाढत आहे. जमिनींना सोन्याचा भाव आल्याने तसेच राजकीय वर्चस्वाच्या वादामध्ये खून आणले होण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची तळेगाव मध्ये निघृणपणे हत्या करण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वी सोमाटणे फाटा येथे एका सरपंचाची हत्या करण्यात आली होती.