पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहायक राजेंद्र शिर्के याने बारा लाखांची लाच स्वीकारल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिर्के याने एवढी लाच कोणाच्या सांगण्यावरून स्वीकारली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयुक्त वाघमारे यांच्यासह काही बड्या अधिकाऱ्यांच्या पाठबळावरच शिर्के याने लाच स्वीकारण्याची हिम्मत केली असून, आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या पदोन्नतीला स्थगिती द्यावी, आयुक्तांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना आणि भाजपाने केली आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. खासदार बारणे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या महापालिकेत आतापर्यंत झाला आहे. बांधकाम व्यावसायिकांना वेठीस धरून राजरोसपणे पैशांची मागणी होत असून, सायंकाळानंतर बांधकाम विभाग व नगररचना विभागामध्ये चालू असलेली कामे हा या महापालिकेतील भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू आहे. नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाही आणि प्रत्येकाचे विशिष्ट दर ठरलेले आहेत. बांधकाम विभागातही सर्रास सामान्यांपासून ते मोठ्या बांधकाम व्यावसायिकांपर्यंत अडवणूक करून छोट्या- मोठ्या त्रुटी काढून नागरिकांना त्रास देऊन पैशांची मागणी केली जाते. पैसे घेणाऱ्यांची व पैसे पोच करणाऱ्यांची एक प्रकारची साखळीच आहे. महापालिकेचे प्रमुख अधिकारी ते महापालिका आयुक्त हे या सर्व भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत.थोरात म्हणाले, ‘‘वाघमारे यांचे स्वीय सहायक राजेंद्र शिर्के यांनी बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला देण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडून बारा लाख रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत शिर्के यांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा भ्रष्टाचार समोर आला आहे. आयुक्त दिनेश वाघमारे निष्क्रिय अधिकारी असून, त्यांच्या गलथान कारभारामुळे महापालिका प्रशासन बेशिस्त झाले असल्याचे आपल्या निदर्शनास वेळोवेळी आणून दिले आहे. तसेच महापालिका प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत. प्रशासनात अनेक अधिकारी आणि कर्मचारी भ्रष्ट आहेत.’’ (प्रतिनिधी)
आयुक्तांची चौकशी करा
By admin | Published: April 27, 2017 5:04 AM