येरवडा : लोहगाव-वाघोली रस्त्यावरील माऊंट सेंट पॅट्रिक विद्यालयामध्ये आज जिल्हा परिषदेच्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी सुरू केली आहे. या विद्यालयाचा उपप्राचार्य सुरेश जॉनपॉल आरोग्यदास अॅडकलस स्वामी (वय ३०, सध्या रा. लोहगाव, मूळ पुनलवासल, ता. त्रिवययार, जि. तंजावर, तमिळनाडू) याला अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी मंगळवारी (दि. १८) अटक केली असून, न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीकडून चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये हवेली पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मीना यादव, जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी जयश्री दोंदे, हवेली पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब धुमाळ या सदस्यांचा समावेश आहे. या समितीने आज या विद्यालयातील शिक्षक व शिक्षिकांचे स्वतंत्रपणे जबाब घेतले. आम्ही विद्यार्थिनींचेही जबाब नोंदविणार आहोत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान २ दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतरच अहवाल अथवा निष्कर्ष काढता येईल. यामध्ये शाळा प्रशासन दोषी आढळल्यास वरिष्ठांकडे कारवाई करण्याची शिफारस करण्यात येईल, असे मीना यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
माऊंट सेंट पॅट्रिक विद्यालयाची चौकशी
By admin | Published: November 21, 2014 3:50 AM