पिंपरी : भोसरी सहल केंद्राच्या ठिकाणी असलेल्या तलावात सनी बाळासाहेब ढगे (रा. लांडगेआळी, भोसरी) या तरुणाचा गुरुवारी दुपारी मृतदेह आढळून आला. हा मृत्यू कसा झाला, त्यास जबाबदार कोण असावे, याबाबत चौकशी करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करून आठवडाभरात अहवाल मागविला आहे.आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीत अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचा समावेश आहे. आठवडाभरात त्यांनी चौकशी अहवाल सादर करावा, असा आयुक्तांचा आदेश आहे. जलतरण तलावात तरुणाचा मृत्यू होण्याची घटना गंभीर असून, याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त नितीन कापडनीस यांनी तलावाच्या ठिकाणी काम करणारे लिपिक, २ जीवरक्षक, २ मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून लेखी म्हणणे मागविले आहे. त्यांनी केलेला खुलासा समाधानकारक न वाटल्यास त्यांच्यावर प्रशासनातर्फे कारवाई होण्याची शक्यता आहे.
त्रिसदस्यीय समितीतर्फे चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 4:17 AM