पिंपरी : आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन ९ व १० जुलैला पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने या पालखी सोहळ्याचे व दिंडीप्रमुखांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानिमित्त देहू ते दापोडी व आळंदी ते दिघी रस्त्यापर्यंतच्या पालखी मार्गाची पाहणी आयुक्त राजीव जाधव यांनी केली असून, आवश्यक त्या सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने या पालखी सोहळ्याचे व दिंडीप्रमुखांचे स्वागत करण्यात येणार असून, महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना सतरंजी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आषाढी वारी पालखी सोहळा २०१५साठी महापालिकेच्या वतीने द्यावयाच्या सोयी-सुविधांबाबत सर्व कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निगडी येथील भक्ती- शक्ती शिल्पासमोरील चौक आणि आळंदी फाटा, भोसरी येथे स्वागतकक्ष उभारण्यात येणार आहेत. खराळवाडी, दापोडी येथील विसाव्यांच्या ठिकाणी स्वागतकमान, बॅनर व दर्शनासाठी बॅरेकेट्स उभारण्यात येणार आहेत. आकुर्डी मुक्कामासाठी महापालिकेच्या व खासगी शाळा ताब्यात घेण्यात आलेल्या असून, तेथे वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व इतर आरोग्यविषयक सर्व सेवासुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच, श्री संत तुकाराममहाराज पालखी, देहू यांचे प्रस्थानापासून ते पंढरपूर वारी वाखरीपर्यंत अग्निशामक वाहनांची व कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पालखी मार्गावर ठिकठिकाणी वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिकेची सोय केली असून, वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्टॉलवरील अन्न नमुने तपासणीकामी शासनाच्या संबंधित खात्याशी समन्वय ठेवून अन्न निरीक्षक नेमणेकामी संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, पालखी आगमनाच्या वेळी व मुक्कामांच्या ठिकाणी, विसाव्याच्या ठिकाणी व पालखी मार्गावरील जनावरे पकडण्यासाठी विशेष पथक नेमणेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. (प्रतिनिधी)
दोन्ही पालखी मार्गांची पाहणी
By admin | Published: July 08, 2015 2:00 AM