पिंपरी : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जास्त बूथ संख्या असलेल्या तीन मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत लोकसभेच्या चार मतदारसंघाचा भाग येतो. लोकसभेच्या मावळ मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, निगडी, देहूरोड, रावेत, वाकड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, भोसरी पोलिस ठाण्याच्या काही भागाचा समावेश आहे. लोकसभेच्या शिरूर मतदारसंघात भोसरी पोलिस ठाण्याचा काही भाग, एमआयडीसी भोसरी, चिखली, दिघी, आळंदी, चाकण, महाळुंगे एमआयडीसी या पोलिस ठाण्यांचा भाग येतो. हिंजवडी पोलिस ठाण्याचा काही भाग पुणे, काही भाग मावळ तर काही भाग बारामती मतदारसंघात येतो.
पिंपरी-चिंचवड पोलिसांना निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्याअनुषंगाने पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुरुवारी (दि. २२) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक बूथसंख्या असलेल्या मतदान केंद्रांना भेट दिली. त्यामध्ये महादू सस्ते मनपा शाळा बोराडेवाडी, सावित्रीबाई फुले मनपा शाळा मोशी गावठाण, नागेश्वर विद्यालय मोशी या मतदान केंद्रांचा समावेश आहे. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आदी उपस्थित होते.
बंदोबस्ताचा आराखडा -
निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रांवर लावण्यात येणारा बंदोबस्त तसेच बाहेरून मागविण्यात येणारा बंदोबस्त याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यासह मतदान केंद्रांच्या इमारतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेऊन पोलिस आयुक्त चौबे यांनी सूचना केल्या.
लोकसभेच्या आगामी निवडणुका निर्भयपणे, नि:पक्षपातीपणे व पादरदर्शकरित्या पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. बंदोबस्ताचा आराखडा तयार करून सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्यात येत आहे.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड