लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : स्मार्ट सिटीत तिसऱ्या फेरीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या समावेशाची औपचारिकता शिल्लक आहे. दरम्यानच्या काळात पॅनसिटीचा आराखडा तयार करण्यात येईल. हे काम सुरू केले आहे. स्मार्ट सिटीसाठी एसपीव्ही स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटीत गुणवत्ता असूनही नाकारले होते. त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर अन्य शहरे या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पिंपरी-चिंचवडचा विचार भाजपाने केला होता. महापालिका निवडणुकीपूर्वी शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. पुण्यातील मेट्रोच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी पिंपरीचा स्मार्ट सिटीत समावेश करू, अशी घोषणा केली. निवडणुकीपूर्वीच राज्य शासनाने याबाबतचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविला होता. निवडणूक संपताच आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. पॅनसिटी निश्चितीसाठी नागरिकांचा अभिप्राय मागविला होता. स्मार्ट सिटीच्या कामाला चालना मिळाली आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे.पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी हर्डीकर यांची नियुक्ती झाल्यानंतर स्मार्ट सिटीची सद्य:स्थिती काय, या विषयी विचारले असता हर्डीकर म्हणाले, ‘‘नागपूर महापालिकेचा आयुक्त असताना स्मार्ट सिटीत समावेश झाला. त्यामुळे आपल्याला याबाबतचा अनुभव आहे. उशिरा का होईना पिंपरी महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झाला असला, तरी आपण जलदगतीने पुढे जाऊ. स्मार्ट सिटीचा बृहत् आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. एसपीव्ही स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका सभेला दिला आहे. स्मार्ट सिटी योजनेत हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात विविध कामांना केंद्र सरकारचे पाचशे कोटी रुपयांचे, राज्य सरकारचे अडीचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेला अडीचशे कोटी रुपये स्वहिस्सा खर्च करावा लागणार आहे.’’
स्मार्ट सिटीसाठी एसपीव्ही होणार स्थापन
By admin | Published: May 11, 2017 4:41 AM