पिंपरी : महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आता काही सामाजिक संस्था, खासगी कंपनी व विविध संघटनांनी देखील पुढाकार घेतला आहे. मतदान करणाऱ्या नागरिकाला विविध सवलती देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मतदान हा मूलभूत अधिकार असून, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मात्र, अनेकजण मतदानासाठी घराबाहेर पडत नाहीत. दरम्यान, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध पातळीवर जनजागृती केली जाते. वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. आता यामध्ये सामाजिक संस्था, व्यावसायिक संघटनाही पुढे सरसावल्या आहेत. मतदान करणाऱ्या नागरिकाला विविध सवलती देण्याचे संघटनांकडून जाहीर करण्यात आले आहे. संजीवनी आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राच्या वतीने मतदान करून येणाऱ्या रुग्णाची मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच औषधांमध्ये २० ते २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. एका सर्व्हीस सेंटरने मतदान करणारांना मोफत गाडीचे वॉशींग देण्याचा निर्णय घेतला आहे. बी-पॉझिटीव्ह संस्थेच्या वतीने जनजागृतीवर भर दिला आहे. (प्रतिनिधी)
मतदान वाढीसाठी संस्थांचा पुढाकार
By admin | Published: February 21, 2017 2:57 AM