रावेत : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाल्हेकरवाडी येथील प्राथमिक शाळेची महापौर राहुल जाधव यांनी पाहणी केली. शाळेतील समस्या जाणून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या. उपमहापौर सचिन चिंचवडे, शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेविका संगीता भोंडवे, अश्विनी चिंचवडे, शर्मिला बाबर, ब प्रभाग स्वीकृत नगरसदस्य बिभीषण चौधरी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर वाल्हेकर,माजी उपसभापती नाना शिवले, हेमंत ननवरे आदी उपस्थित होते.
महापौर जाधव यांनी महापालिकेच्या शाळांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. महापालिकेच्या सर्व शाळांच्या समस्या महापौर जाणून घेत आहेत. वाल्हेकरवाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये वर्ग-खोल्या वाढविणे, पुरेशा शिक्षकांच्या नेमणुका करणे, स्वच्छता राखणे, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षकांची उपस्थिती, शैक्षणिक पद्धती, क्रीडांगण, शालेय साहित्याचा पुरवठा आदी गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला. उपशिक्षक सूर्यभान तिकोणे यांनी आभार मानले. सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.शाळेला मिळावी सुसज्ज इमारत४महापालिकेच्या शहरातील इतर शाळांच्या तुलनेत वाल्हेकरवाडीतील शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने सध्याची इमारत अपुरी पडत आहे. मुख्याध्यापक कल्याण खामकर यांनी शाळेच्या वर्गखोल्यांची कमतरता, शाळेला मैदान नाही, पिण्याच्या पाण्याचा अभाव या समस्यांबाबत महापौरांना माहिती दिली. वाढती विद्यार्थिसंख्या पाहता शाळेला जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे परिसरात उपलब्ध असलेल्या जागेवर प्रशस्त अत्याधुनिक इमारत बांधून मिळावी अशीही मागणी मुख्याध्यापकांनी महापौरांकडे केली.