पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातील इच्छुकांच्या मुलाखती उद्यापासून सुरू होणार आहेत. पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना तीन लाख रुपये मोजावे लागणार आहेत. इच्छुकांमध्ये या अजब फंड्यामुळे अस्वस्थता पसरली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. तीनही मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांची संख्या अधिक आहे. निवडणुकीतील उमेदवारीसाठी पक्षनिधी घेतला जातो. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये इच्छुकांनाही मुलाखत देण्यासाठी निधी द्यावा लागणार आहेत.
शहर भाजपातील एक पदाधिकारी इच्छुकांना ‘तीन लाखांचा चेक घेऊन या...’ असे फोनवरून सांगत असल्याचे एका इच्छुकाने पत्रकारांशी बोलताना सांगितले. याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका समजू शकली नाही. मात्र भाजपच्या अजब निर्णयाबद्दल कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.