पिंपरी : पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये गट-तट असल्याने पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला सूर सापडेनासा झाला आहे. त्यामध्येच थेट शहराध्यक्ष कैलास कदम यांच्याविरोधातच काँग्रेसमधील एक गट सक्रिय झाला आहे. काँग्रेसमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ ही संकल्पना असल्याने शहराध्यक्ष कैलास कदम यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या गटाने काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. त्यामुळे शहर काँग्रेसमधील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे.
काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदावर कामगार नेते कैलास कदम यांची ७ ऑक्टोबर २०२१ रोजी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कदम यांची नियुक्ती होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. कदम यांच्याकडे इंटकचे पुणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव हे पद आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात एक व्यक्ती एक पद असा ठराव होऊनही शहराध्यक्ष कदम यांच्या बाबतीत या निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही? कदम यांना महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या नेत्यांचा आशिर्वाद आहे का? असा थेट सवाल या गटाने उपस्थित केला आहे.
ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची कठोर भूमिका-
राजस्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसचे शिबीर पार पडले होते. या शिबिराला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह सुमारे चारशेपेक्षा जास्त नेत्यांची उपस्थिती होती. याच शिबीरात ‘एक व्यक्ती एक पद’ हा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. त्यांची अमंलबजावणी संपूर्ण देशामध्ये करण्यात आली. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात याबाबत दुर्लक्ष केले आहे. काँग्रेसच्या धोरणानुसार एक व्यक्ती एक पद असा ठराव असतानाही कदम यांच्याकडे दोन पदे असल्याबाबत शहरातील काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
शहराध्यक्ष 'नॉट रिचेबल'-
शहर नेतृत्वावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कदम यांना महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या नेत्यांचा आशिर्वाद आणि पाठिंबा आहे का? असे म्हणत एक व्यक्ती एक पद सूत्राचा काँग्रेसच्या वरिष्ठांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत शहराध्यक्ष कैलास कदम यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.