पिंपरी : इंटरनेटवर केवळ माहिती आहे. ज्ञान मिळविण्यासाठी माहितीच्या पलीकडे जाऊन वाचन साधना करावी लागेल. कारण वाचनाला इंटरनेट नव्हे तर वाचनच पर्याय आहे. म्हणून तर माहिती तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या देशात प्रत्येक पुस्तकाच्या लाखो प्रती खपतात, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.शब्द संस्था, एल्गार सामाजिक साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण, राज्यस्तरीय कथा लेखन स्पर्धा बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पी. के़ इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष जगन्नाथ काटे, शिवाजी घोडे आदी उपस्थित होते. या वेळी मकरंद पांडे, नितीन धिमधिमे यांना उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक पुरस्कार, विद्युत सनियंत्रण समितीचे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांना भ्रष्टाचार विरोधी केलेल्या कार्याबद्दल आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, बबन डांगले यांना उत्कृष्ट चार्टर्ड अकाउंटंट पुरस्कार, हिरालाल व सरस्वती पाटील यांना आदर्श दांपत्य पुरस्कार दिला. राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत अंजली घंटेवार- नागपूर (कथा क्षितिज), अरुण देशपांडे-बावधन (वरची खोली), मानसी चिटणीस- चिंचवड (गिरिजा) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. तर पूजा बागूल-नाशिक (कथा-प्राजक्ता) एऩ आऱ पाटील- चाळीसगाव (भुत्या) चौथे व पाचवे (उत्तेजनार्थ) बक्षीस दिले.डॉ़ कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘भ्रष्टाचार हा समाजाला लागलेला रोग आहे. तो सर्व क्षेत्रांना जडला आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनला आहे. सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी जनतेचे नोकर म्हणून कधीच काम करीत नाही. मुंबईतील मराठी शाळा बंद करण्याचे कारण म्हणजे तेथील जागांना आलेले भाव. मराठी शाळा बंद करून शाळेची जागा विकायची आणि मलइ खायची हा सरकारचा हेतू आहे. देशातील सत्तर टक्के जनता अत्यल्प उत्पन्नावर उदरनिर्वाह करीत आहे. यालाच देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, असे म्हणायचे का? भ्रष्टाचाराविरोधात कार्य करणाऱ्या कार्यकर्ता किंवा क्रांतिकारकांची आज ही हत्या केली जाते.’’ साहेबराव जाधव यांनी सूत्रसंचालन केले. महादेव हुंबरे यांनी आभार मानले.
वाचनाला इंटरनेट नव्हे वाचनच पर्याय - नागनाथ कोत्तापल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 1:19 AM