पिंपरी : नामांकित कंपनीशी नामसाधर्म्य असलेली कंपनी चालवून दिशाभूल केली. तसेच या माध्यमातून घरसामान व इतर वस्तूंची वाहतूक करून खंडणी उकळल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाने ही कामगिरी केली. यात आंतरराज्य रॅकेट असल्याचे दिसून येते, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विरेंद्रकुमार रामकिशन पुनिया (वय २५, रा. निगडी, मूळ रा. राजस्थान), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आशिष शिवाजीराव गावडे (वय ४३, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादी यांचे मित्र राजेश नायक (रा. कोथरुड) यांचे घरसामान व दुचाकी हे कोथरुड येथून मेंगलोर येथे पोहोच करायचे होते. त्यासाठी व्हीआरएल कार्गो इंडिया पॅकर या कंपनीच्या वेबसाईटवरून त्यांनी सोनू चाैधरी याच्याशी संपर्क साधला. नायक यांचे साहित्य पुणे येथून मेंगलोर येथे पोहोच करण्यासाठी ११ हजार रुपये भाडे ठरविले. त्यासाठी नायक यांनी आठ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आरोपी याने नायक यांचे एक लाख ६० हजार रुपयांचे साहित्य कोथरुड येथून घेतले मात्र मेंगलोर येथे पाहोच केले नाही. साहित्य पाहिजे असल्यास ठरलेल्या रकमेपेक्षा आणखी नऊ हजार रुपये मागितले.
नायक यांचे घरसामान व दुचाकी घेऊन गेलेल्या टेम्पोच्या चालकास ताब्यात घेऊन पोलिसांनी चाैकशी केली. त्यानंतर निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर येथून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी विरेंद्रकुमार पुनिया हा सोनू चाैधरी, सोनू कुमार, विक्रम सिंग, असे वेगवेगळे नाव व मोबाईल क्रमांकांचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी याच्याकडून १० हजारांचा मोबाईल, नायक यांचे एक लाख ६० हजारांचे घरगुती साहित्य व दुचाकी जप्त केली.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक अनिल लोहार, उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस कर्मचारी महेश खांडे, राजेंद्र शिंदे, उमेश पुलगम, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, प्रवीण कांबळे, नितीन लोखंडे, गणेश कोकणे, प्रवीण माने, नागेश माळी, अतुल लोखंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.