पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या. चिंचवड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या महापालिकेच्या १३ प्रभागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाच्या कार्ड कमिटीतील पुण्यातील वरिष्ठ नेत्यांपैकी कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांरी व प्रदेश कार्यकारणीवरील काही इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीत उर्वरित इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. थेरगाव येथील मोरया मंगल कार्यालयात सकाळी नऊपासून मुलाखत कार्यक्रमाचे नियोजन होते. प्रत्यक्षात अकराच्या सुमारास मुलाखती सुरू झाल्या. इच्छुक उमेदवार, तसेच त्याचे काही समर्थक अशा निवडक लोकांना मुलाखतस्थळी प्रवेश दिला जात होता. प्रभागातील मतदारसंख्या, समस्या, उमेदवाराचे प्रभागातील कार्य, जनसंपर्क या अनुषंगाने मुलाखतीत प्रश्न विचारले जात होते. मुलाखत घेण्यासाठी व्यासपीठावर बसलेल्यांपैकी काहीजण स्वत:च इच्छुक होते. कार्ड कमिटीचे सदस्य पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, सदाशिव खाडे, एकनाथ पवार, माऊली थोरात, बाबू नायर, प्रमोद निसळ, सारंग कामतेकर, संजय मंगोडेकर, अमोल थोरात, महेश कुलकर्णी, राजेश पिल्ले, अमर मूलचंदानी, वसंत वाणी, रवि लांडगे, शैला मोळक, मनोज तोरडमल आदींच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या. (प्रतिनिधी)
इच्छुकांनीच घेतल्या मुलाखती
By admin | Published: January 03, 2017 6:28 AM