पिंपरी :थायलंड येथील कंपनीमध्ये भागीदारी देण्याचे व मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तिने विश्वास ठेवून तब्ब्ल २२ लाखांची गुंतवणूक केली. मात्र आरोपी पैसे घेऊन फरार असल्याने व्यक्तीची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार भोसरीत घडला आहे. एमआयडीसी भोसरी येथे ऑगस्ट २०१८ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ही घटना घडली.
चंद्रकांत प्रभुदास ठक्कर (वय ५४, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. ३०) फिर्याद दिली आहे. हेमिन जसुभाई खोखर, दिव्यांग कानुभाई डोबारीया (दोघेही रा. सुरत, गुजरात), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ठक्कर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर थायलंड देशातील बँकॉक येथील थाई ॲक्वा कंपनीमध्ये भागीदारी देण्याचे व मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. त्यांना कंपनीत २२ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर कंपनीच्या नफ्या-तोट्याचा हिशेबही दिला नाही. कंपनीमध्ये गुंतवलेल्या रकमेची ठक्कर यांनी मागणी केली. मात्र आरोपींनी ती रक्कम परत न देता सदरची कंपनी परस्पर बंद केली. तसेच कंपनीतील मशिनरी सुरत येथे नेऊन दुसरी कंपनी स्थापन करून त्यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. पांचाळ तपास पुढील करत आहेत.