पिंपरी : आयपीएल (IPL) क्रिकेट स्पर्धेत उत्तम फलंदाजी करणारा चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) शिलेदार ऋतूराज गायकवाड याचे रविवारी सकाळी जुनी सांगवीतील घरी आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत व शुभेच्छांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी ऋतुराजाच्या घराबाहेर आकर्षक फुग्यांची सजावटही केली होती. ऋतुराज घराबाहेर येताच भारतीय संस्कृतीप्रमाणे कुटुंबीयांनी त्याचे औक्षणही केले.
कालच आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ऋतूराज गायकवाड याच्या कामगिरी बद्दल शहरवासीयांनी फटाके फोडून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला होता. जुनी सांगवीतील मधुबन सोसायटीत राहणा-या ऋतुराज ने आपल्या शैलीदार फलंदाजीने क्रिकेट वर्तुळात स्वताचा ठसा उमटवला. जुलै महिन्यात ऋतुराजने वन डे व टी 20 सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघात श्रीलंका दौऱ्यात त्याची निवड झाली होती.
पिंपरी चिंचवडचा पहिला खेळाडू
पिंपरी चिंचवड शहरामधून भारतीय संघात देशाचे प्रतिनिधित्व करणारा ऋतुराज पिंपरी-चिंचवडचा पहिला खेळाडू आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगाव नेमाने हे ऋतुराजचे मुळगाव वडील नुकतेच लष्कर सेवेतून वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले तर आई शिक्षिका व गृहिणी आहे. या हंगामात त्याने चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळताना सर्वाधिक ६३५ धावा करून ऑंरेज कॅपचा मानकरी ठरला आहे. मधुबन जुनी सांगवीच्या मातीत वाढलेल्या मराठमोळ्या खेळाडूवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून आपल्या भारदस्त रेखीव खेळाने क्रिकेट जगतातील तमाम क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधणाऱ्या जुनी सांगवी च्या सुपुत्राने भारतीय संघातही स्थान मिळवलेले आहे. त्याने पिंपरी-चिंचवडच्या व्हेराक-वेंगसरकर अकादमीमधून क्रिकेटचे धडे घेतले आहेत.