पिंपरी : आयपीएलच्या तिकीटाची चढ्या दराने विक्री करून फसवणूक करण्याच्या प्रयत्न उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. चिंचवड येथे चापेकर चौकात बुधवारी (दि. १०) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
चेतन नामदेव पाटील (२५, रा. दिघी) व सचिन विनोद कुंभार (२१, रा. प्राधिकरण निगडी) यांना पोलिसांनी अटक केली. आकाश विजय साळवी (२५, रा. दिघी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) टी-२० ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. देशभरात या स्पर्धेचा फिव्हर आहे. स्पर्धेतील सामन्यांच्या तिकीटांना मोठी मागणी आहे. दरम्यान, चेतन पाटील आणि सचिन कुंभार या दाेघांनी आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्याच्या तिकीटांचा साठा करून ते तिकीट मूळ रकमेपेक्षा जास्त रकमेने विकत काळा बाजार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी आकाश यांना देखील क्रिकेट सामन्याचे तिकीट विकण्याचा प्रयत्न करून ९२ हजार २०० रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
तिकीटांचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली.