पिंपरी : स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत महिनाअखेरीस पूर्ण होत आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य निवडीतील बंडखोरी रोखण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. पक्षनेता एकनाथ पवार यांनीही राजीनामा दिल्याने जुन्या-नव्यांपैकी कोणास संधी मिळणार? पक्षश्रेष्ठी गटबाजी मोडून काढणार का? याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा आहे. सदस्य निवडीनंतर स्थायी अध्यक्ष कोणत्या गटाचा होणार यावरूनही गटबाजीची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतील सोळा सदस्यांपैकी दरवर्षी आठ सदस्य बाहेर पडतात. आणि नव्याने आठ सदस्य नियुक्त केले जातात. त्यापैकी आठ सदस्यांची मुदत या महिअखेरीस पूर्ण होत आहे. सोळा सदस्यांपैकी भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. एकूण संख्याबळानुसार स्थायी समितीत सदस्यांची नियुक्ती होते. भाजपातील स्थायीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी अध्यक्षा ममता गायकवाड, सागर आंगोळकर, राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २९ फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. त्यामुळे भाजपाकडून कोणाची नावे सुचविण्यात येणार याबाबत उत्सुकता आहे. स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागविले असून, भाजपातर्फे पक्षांतर्गत नियुक्तीसाठी चर्चा सुरू आहे. महापालिकेत ५ अपक्ष नगरसेवक भाजपशी संलग्न आहेत. या सदस्यांना एक वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. त्यानुसार कैलास बारणे, साधना मळेकर, झामाबाई बारणे सदस्य आहेत. उर्वरित सदस्य नीता पाडाळे, नवनाथ जगताप यापैकी यावर्षी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. ...............स्थायी अध्यक्षपद भोसरीला? महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊन तीन वर्षे पूर्ण होत आहेत. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यात सत्ता आणि पदवाटपाचे धोरण ठरलेले आहे. त्यानुसार दोन वर्षे महापौरपद भोसरीकडे होते. नितीन काळजे, राहुल जाधव यांना संधी मिळाली होती. आता महापौरपद चिंचवडकडे आले आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपद भोसरीकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे. अध्यक्षपदी ममता गायकवाड आणि भोसरीतील सीमा सावळे, विलास मडिगेरी यांना संधी मिळाली होती. त्यामुळे नवीन अध्यक्षपदी भोसरीतून कोणास संधी मिळणार, हे स्थायी समितीवर सदस्य कोण होणार, यानंतर ठरणार आहे. स्थायीत जाण्यासाठी भाजपा नगरसेवकांमध्ये चुरस आहे. त्यातील एकाची अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे..........भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी महापालिकेची आगामी निवडणूक २०२२ ला होणार आहे. निवडणुकीसाठी दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेवटच्या दोन वर्षांत अर्थपूर्ण अशी समिती मिळावी, यासाठी भाजपात इच्छुकांची संख्या अधिक आहे. तीन वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद चिंचवड विधानसभेकडे होते. त्यामुळे यंदाचे अध्यक्षपद भोसरीकडे जाणार असून, सदस्यांमधूनच अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. .............प्रदेशाध्यक्षांकडून पक्षनेत्यांची निवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य, अध्यक्ष आणि पक्षनेता या महत्त्वाच्या पदांची निवड होणार आहे. पक्षनेते पवार यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. यानंतर भाजपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नवीन नाव निश्चित करून विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवतील, त्यानंतर निवड होईल. २पक्षनेता चिंचवड की भोसरीचा होणार? याबाबत चर्चा आहे. सत्तारूढ पक्षनेतेपदासाठी माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेवक नामदेव ढाके, शीतल शिंदे, शत्रुघ्न काटे यांची नावे पुढे येऊ शकतात. दोन्ही आमदार, आणि पक्षातील जुन्या-नव्यांचा मेळ साधूनच नवीन निवड होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दोन दिवसांत निवड होईल, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे..........पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ भाजपाचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे. त्यांची विनंती पक्षाने मान्य केली असून नवीन पक्षनेता निवडीसाठी विभागीय आयुक्तांना येत्या दोनच दिवसांत पत्र दिले जाणार आहे. त्यानंतर पक्षनेता निवड जाहीर होईल. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा. ..............