रावेत : जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या हस्ते तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणच करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांच्याकडे हात करीत देवेंद्र फडणवीस यांना पवार बोलणार नाहीत का अशी विचारणा केल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे. पवार यांना भाषण न करू दिल्याने मोदींनाच याचे आश्चर्य वाटले. दरम्यान या घडलेल्या प्रकारावरून आता राजकारण तापू लागले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना भाषण न करू देणे हा महाराष्ट्राचा आणि अजित पवार यांचा अपमान आहे. भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी कँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
या कार्यक्रमात मोदी यांच्या आधी देहूसंस्थानच्या अध्यक्षांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले मात्र राज्याचे व्यासपीठावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करू देण्यात आले नाही. यात राज शिष्टाचाराचा भंग झाल्याचा दावा राष्ट्रवादी कँग्रेसने केला असून यासंदर्भात भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली आहे. देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेण्यासाठी आणि त्यांचे राज्याच्या वतीने स्वागत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे विमानतळावर हजर होते. राज्याच्या वतीने पंतप्रधानांचे त्यांनी स्वागत केले. देहू येथील कार्यक्रमात उपस्थित राहिले. हा राज्याचा राजशिष्टाचार अजित पवार यांनी पाळला असून पंतप्रधान कार्यालयाने त्यांचा राजशिष्टाचार का पाळला नाही?असा संतप्त सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी विचारला आहे.
स्थानिक खासदार आणि आमदाराला कार्यक्रमाला निमंत्रणच नाही
राज शिष्टाचारानुसार ज्या ठिकाणी राजकीय कार्यक्रम असेल तेथे स्थानिक खासदार आणि आमदाराला निमंत्रित करणे आवश्यक असते मात्र या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधिंना निमंत्रण नसल्यामुळे त्यावरुन आर्श्चय व्यक्त होत आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना निमंत्रण नव्हते. या दोघांच्या मतदारसंघात हा कार्यक्रमात होता. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
''उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधानांच्या सभेत बोलू न देणे हे जाणिवपूर्वक घडले आहे, असे दिसते. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे भाषण करण्याचा त्यांचा अधिकार आहे. कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलू दिले पण अजित पवार यांना नाही.ही एक प्रकारची भाजपाची हुकूमशाही असल्याचा आरोप माजी विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ यांनी केला आहे.''