- विश्वास मोरे पिंपरी : हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरीत जाण्यासाठी आयटी अभियंत्यांना वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. थेरगाव डांगे चौक ते हिंजवडी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कोंडीचा अनुभव अभियंते व नागरिकांना येतो. डांगे चौकातील कोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आयटी पार्क आणि पुण्याला जाणाऱ्या मार्गावर होणारी वाहतूककोंडी सुटणार आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीच्या सीमेवर हिंजवडी असून, त्या ठिकाणी १९९९ मध्ये राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरीची पायाभरणी झाली आहे. त्यानंतर देश-परदेशातील आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. सुमारे दीड लाख अभियंते आणि कामगार या आयनगरीत येत असतात. हिंजवडीत प्रवेश करण्यासाठी वाकड, तसेच थेरगावमार्गे असे दोन रस्ते आहेत. औद्योगिकीकरण वाढल्याने जगताप डेअरी ते हिंजवडी आणि थेरगाव डांगे चौक ते हिंजवडी या रस्त्यावर वाहतूककोंडीचे प्रमाण वाढले आहे.सकाळी नऊ ते सायंकाळी पाचनंतर या भागातील रस्त्यांवर कोंडीचा अनुभव येतो. पाच मिनिटांच्या अंतरासाठी तासन्तास खोळंबा होतो. वाहतूक पोलिसांनी नियोजन केले असले, तरी कोंडीचा सामना अभियंत्यांना करावा लागत आहे. पुनावळे-काळेवाडी फाटा हा बीआरटी रस्ता केला आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी थेरगाव डांगे चौकात छत्रपती शिवाजीमहाराज उड्डाणपुलाची निर्मिती केली आहे. मात्र, बीआरटी लेन पुलाखालून असल्याने कोंडीत भर पडत आहे.डांगे चौकात प्राधिकरण, निगडी, चिंचवड, भोसरी अशा विविध परिसरांतून वाहने येतात. काही वाहने बंगळूर महामार्गावर जातात, तर काही वाहने आयटी पार्कला जातात. पुनावळे, चिंचवडकडून वाहने येण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे चौकात वाहतुकीची कोंडी होत असते. याबाबत महापालिकेने खासगी सल्लागारामार्फत वाहतुकीचे सर्वेक्षण केले होते. त्या वेळी या भागात सकाळी आणि सायंकाळी या दोन वेळेत वाहतूककोंडी होत असल्याचे म्हटले होते. तसेच या चौकाचा अभ्यास केल्यानंतर उड्डाणपूल की ग्रेड सेपरेटर उभारायचा याबाबत अभ्यास केला. रावेत-औंध बीआरटी लेनवर विद्युत विभागाचे टॉवर अधिक आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या पुलावरून पूल टाकणे अवघड होते, हे पाहणीत आढळून आले. त्यामुळे ग्रेड सेपरेटरचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.चिंचवड-हिंजवडी मार्गावर डांगे चौक येथे दोन लेनचा ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. ४७० मीटर लांबीचा तो असून, आरसीसी बॉक्समध्ये तयार केला जाणार आहे. चौकातील रस्ता ६१ मीटर असून, त्यापैकी १५.५ मीटरच्या दोन लेन, त्यातील एक लेन सात मीटरची असेल. पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या आणि पावसाळी गटार, सांडपाण्याच्या वाहिन्यांचेही नियोजन केले आहे. या कामाची निविदा २३ कोटींची असून, त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या कामासाठी अर्थसंकल्पात दहा कोटींची तरतूदही केली आहे. दीड वर्षात काम पूर्ण करावे, याबाबतचा आदेश दिला आहे.डांगे चौकातील सिग्नल १६० सेकंदाचा आहे. ग्रेड सेपरेटरमुळे सिग्नल निम्म्याने कमी होणार आहे. पुणे आणि पुनावळेला जाण्यासाठी केवळ ९० सेकंदाचा सिग्नल असेल. तसेच चिंचवडवरून हिंजवडी आणि महामार्गाला जाणाºया वाहनांना डांगे चौक हा सिग्नल फ्री होणार आहे. चिंचवडवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे चौकातील कोंडीत भर पडत होती. अवजड वाहने पुलाखालून गेल्याने अपघाताचा धोका कमी होणार आहे.डांगे चौक येथील ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी दीड वर्षाची मुदत आहे. ग्रेड सेपरेटरमुळे वाहतूककोंडी टाळण्याबरोबरच चिंचवड-हिंजवडीच्या वाहतुकीसाठी हा चौक सिग्नल फ्री होणार आहे. निविदा प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली आहे. कामाचा आदेश लवकरच देण्यात येणार आहे.- विजय भोजणे, बीआरटी अभियंताग्रेड सेपरेटर लांबी 470 मीटरग्रेड सेपरेटरच्या दोन लेन- 15.5 मीटरनिविदा 23 कोटींचीकालमर्यादा 18 महिनेअर्थसंकल्पात या वर्षी 10 कोटींची तरतूदचिंचवड-हिंजवडीसाठी सिग्नल फ्री चौक
आयटी पार्कची वाहतूककोंडी सुटणार; डांगे चौकात ग्रेड सेपरेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 03:01 IST