पिंपरी : राज्यातील प्रकल्प गुजरातला जात आहेत. यासाठी शिंदे - फडणवीस सरकारला जबाबदार धरणे चुकीचे आहे. राज्याबाहेर प्रकल्प जाण्यासाठी महाविकास आघाडीने आधीच घेतलेले निर्णय कारणीभूत ठरत आहेत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली.
पिंपरीतील वल्लभनगर येथे आरपीआय (आठवले गट) महिला आघाडी कार्यकारिणीच्या बैठकीला रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “शिवसेनेमध्ये जे बंड झाले. त्या बंडाला उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत. त्यांनी भाजपची फसवणूक केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना खिळखिळी झाली आहे. त्यामुळे भाजप - आरपीआय युती मुंबई महापालिकेत विजय मिळवेल.”
विस्तारात आरपीआयला एक मंत्रिपद
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी आरपीआयकडून एका मंत्रिपदाची मागणी आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवाय महामंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेत देखील वाटा मागण्यात आला असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
गुजरातमधील घटनेला अधिकारी जबाबदार
गुजरातमध्ये पूल तुटून झालेल्या दुर्घटनेला अधिकारी जबाबदार आहेत. पूल सक्षम आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची होती. फक्त सरकारला यात जबाबदार धरून चालणार नाही, असे आठवले म्हणाले.
...त्यांचे फिरले डोके
शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात गेलेल्या आमदारांना ५० खोके, असे म्हणून लक्ष्य केले जाते. ते चुकीचे आहे. असे म्हणत रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत कविता करत ‘जे म्हणतात घेतले ५० खोके त्यांचे फिरले डोके’ असा टोला लगावला. तसेच आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मिटत नसेल तर आपण मध्यस्थी करू, असेदेखील आठवले म्हणाले.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत
राज्यात आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी आरपीआय भाजपसोबत युती करेल, असे संकेत आठवले यांनी दिले. जिथे आमची ताकद आहे तेथे जास्त जागा मागू तसेच काही जागांवर तडजोड केली जाईल, असे आठवले म्हणाले.