- विश्वास मोरे पिंपरी : संगीत ही साधना आहे, व्रत आहे. त्यात कोणताही शॉर्टकट नाही. यश मिळविणे सोपे आहे, ते टिकविणे अवघड आहे. नवतेच्या नावाखाली जुन्या गाण्यांचे विडंबन करण्याची वृत्ती वाढत आहे, ती रोखण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध संगीतकार आणि गायक रूपकुमार राठोड यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड शहरात आशा भोसले पुरस्काराने त्यांचा शनिवारी गौरव होणार आहे. त्यानिमित्ताने साधलेला संवाद.मागे वळून पाहताना काय वाटते? पुरस्काराविषयी आपले मत काय?- मागे वळून पाहताना विशेष आनंद होतो. संगीतसेवा हीच ईश्वरसेवा आहे. त्यामुळे मी समाधानी आणि प्रसन्न आहे. संगीत हे रक्तात असते. त्याचप्रमाणे माझी वाटचाल झाली. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्याला जी गोष्ट करायची ती पूर्णपणे समजून घ्यायला हवी. शिकायला हवी. म्हणून मी शिकाऊ वृत्ती कायम ठेवली आहे. आशा भोसले यांच्याविषयी किती आणि काय बोलावे. बोलावे तेवढे कमीच आहे. त्या संगीताचे विद्यापीठ आहेत. ऊर्जास्रोत आहेत. त्यांच्यातील उत्साह पाहिला की आम्हाला प्रेरणा मिळते. प्रोत्साहन मिळते. मी त्यांना गाताना पाहिलेय. नृत्य करताना पाहिलेय. व्यासपीठावर कला सादर करताना खरेच आशाताई म्हणजे एनर्जी टॉवर आहेत. एवढा सुंदर आवाज, खरे तर ही एक ईश्वरी देणेच आहे.भारतीय चित्रपट संगीतात रीमिक्सचे फॅड आले आहे. ते योग्य की अयोग्य?- काटा लगा, हे मूळ गाणे किती सुंदर आहे. मात्र, ते रिमिक्सनंतर किती व्हल्गर झाले. नावीन्य हवे, परंतु विडंबन केले जाऊ नये. खरे तर आजच्या युगासाठी नवीन काय द्यायचे हा संगीतकारांचा प्रयत्न असतो. नवनिर्मिती ओरिजनल असो. आपल्या मातबर संगीतकारांनी तयार केलेली जुनी गाणी ही खूप चांगली आहेत. त्यांचे विडंबन करणे योग्य नाही. कारण जुन्या गाण्यांनी एक इतिहास रचला आहे. त्या उज्ज्वल अशा परंपरेस तडा देण्याचा अधिकार आपणास कोणी दिला, हा माझा प्रश्न आहे.आशातार्इंची एखादी रेकॉर्डिंगची आठवण सांगा?- आठवणी खूप आहेत. दाद देणे हे आशातार्इंकडूनच शिकायला हवे. तक्षकमध्ये आशातार्इंचे एक गाणे होते, ‘मुझे रंग दे, रंग दे...’ आणि त्याच सिनेमात माझेही ‘खामोश रास्ते...’ हे गाणे होते. आशातार्इंनी मला न्यूयॉर्कवरून फोन केला. तोंडभरून कौतुक केले. दाद दिली. रूप, तक्षकमध्ये माझेही गाणे आहे. ते लोकप्रिय असले, तरी तुझेही गाणे अत्यंत सुंदर आहे. मी अनेकदा ऐकले, ते ऐकावेसेच वाटते आणि हो, हे गाणे मलाच नाही तर माझ्या मुलांनाही आवडते, असे त्या म्हणाल्या. याला म्हणतात, एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली दाद. हा मला मिळालेला आशीर्वाद आहे. आजकाल दुसऱ्यांना दाद देण्याची वृत्ती कमी होत आहे.नवकलावंतांना रिअॅलिटी शोशाप की वरदान?- रिअॅलिटी शोमधून नवीन मुलांना कला सादर करण्याची संधी मिळते. आमच्या काळात असे काही नव्हते. त्यामुळे गुरू-शिष्य परंपरेने आम्ही शिकलो. सराव केला. प्रयोगांतून घडत गेलो. त्या काळी हार्मोनियम घेऊन बैलगाडीतून प्रवास करून गायनाचे कार्यक्रम केले आहेत. गावोगावी जाऊन संगीत ऐकविले. त्या वेळी प्लॅटफॉर्म नव्हता. माझ्या मते सोन्याला झळाळी येण्यासाठी भट्टीमधून जाळून घ्यावे लागते. त्यातूनच सोने अधिक झळाळून निघते.एका महिन्यात एक शो करून सेलिब्रिटी होणे सोपे. सेलिब्रिटी झाल्याने कलावंताच्या डोक्यात हवा जाते. निसर्गाचा नियम आहे, एखादी गोष्ट जेवढ्या वेगाने वर जाईल तेवढ्याच वेगाने खाली येते. हे पाहा, इंडियन आयडलच्या दहा पर्वांतील विजेते कोठे आहेत? त्यांना काम मिळत नाही. डोक्यात हवा जाऊ न देणे आणि संधीचे सोने करून पुढे चालत राहण्यासाठी रिअॅलिटी शो वरदान आहे. संगीतात रियाज महत्त्वाचा आहे. मी १९८६ मध्ये गायन सुरू केले. आजही शिकतच आहे. आता कुठे पुरस्कार मिळत आहेत. शिकणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संगीत महासागर आहे.
सात स्वरांचा अर्थ आपण वेगळेपणाने सांगता?- वडिलांनी मला सात स्वरांचा जीवनातील अर्थ समजावून सांगितला होता. सा समझ, रे से रियाज, ग से ज्ञान, म से माया मिळते, प से परेमश्वर, ध से ध्यान. संगीत समजून घेऊन रियाज केल्यास ज्ञान प्राप्त होते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकप्रियेच्या मायेत कलावंत अडकतो.त्यानंतर ही माया फोल आहे, ही जाणीव परमेश्वर करून देतो. त्यातून ध्यानअवस्था प्राप्त होते. त्यातूनच निरंजन, निराकारत्व येते. जसे संत कबीर, तुलसीदास, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, लतादीदी, आशाताई यांनी स्थान प्राप्त केले की ज्यांच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही. त्यांनी आपली ओळख तयार केली आहे. चंद्र-सूर्याप्रमाणे त्यांचे स्थान अढळ आहे.