पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभारावर तीन खासदारांनी आक्षेप नोंदविले आहेत. विरोधीपक्षानेही लक्ष्य केले आहे. आरोप-प्रत्यारोप प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, बुधवारी मुंबईत झाडाझडती होणार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी रद्द झालेली बैठक होणार असल्याने पदाधिकाºयांनी झाडाझडतीचा धसका घेतला आहे.महापालिकेतील स्थायी समितीने मंजूर केलेल्या ४२५ कोटींच्या निविदेत रिंगप्रकरणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे यांनी आरोप केले होते. तसेच भाजपातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने चौकशीची मागणी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनी केली होती. त्यावरून सीमा सावळे आणि साबळे समर्थकांमध्ये जुंपली होती. ‘पद उपभोगत असताना पक्षातील स्थायी समितीवर आरोप करणे चुकीचे आहे. अमर साबळे यांनीच राजीनामा द्यावा, मगच आरोप करावेत, असे आव्हान सावळे यांनी दिले होते.- रिंग प्रकरणावरून पदाधिकाºयांमध्येच जुंपल्याने पक्षांतर्गत सुरू असणारे वादंग थांबवा, अशी मागणी भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. दरम्यान रिंग प्रकरणावरून भाजपाच्या पदाधिकाºयांमध्येच जुंपल्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात यासंदर्भात बोलावलेली बैठक शहरातील प्रमुख पदाधिकारी परदेश दौºयावर असल्याने रद्द करण्यात आली होती.- रद्द केलेली बैठक बुधवारी मुंबईत होणार आहे. यासाठी दोन्ही आमदार, खासदार, शहरप्रमुख, महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेते यांना बोलावले आहे. या बैठकीस पक्षातील कोअर कमिटीतील सदस्यांना बोलवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे, मात्र, याबाबत पक्षातील पदाधिकाºयांना कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेतील वर्षभरातील कारभार, विविध प्रकरणांबाबत पक्षावर झालेले आरोप, कारभाराबाबतचा सावळा गोंधळ याबाबत मुख्यमंत्री झाडाझडती घेणार असून, समाविष्ट गावांतील ४२५ कोटींच्या रस्ते विकास कामांबाबत खासदारांनी घेतलेले आक्षेप आणि रिंग प्रकरणाबाबत आयुक्त श्रावण हर्डीकरण यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेला अहवालावरही चर्चा होणार आहे.
झाडाझडतीचा घेतला धसका, रिंग प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:41 AM