पिंपरी : मावळ गोळीबार प्रकरणातील मृतांच्या वारसांना महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत कामावर रुजू होण्याचे पत्र त्यांना देण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी शुक्रवारी वारसांना दिले. पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाला मावळातील शेतकऱ्यांचा विरोध होता. तरीही हे काम सुरू ठेवल्याने क्रांतिदिनी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामध्ये कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्यामरावतुपे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यावरून तत्कालीन आघाडी सरकारवर टीका करण्यात आली. दरम्यान, मृतांच्या वारसांना महापालिका सेवेत रुजू करण्याची मागणी होऊ लागली. मात्र, विविध कारणांनी ही प्रक्रिया लांबत गेली. दरम्यान, मृतांच्या वारसांना महापालिकेत नोकरी देण्याचा निर्णय महापालिका सभेत घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. २२ मे २०१५ ला या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानुसार कांताबाई ठाकर यांचे चिरंजीव नितीन ठाकर, मोरेश्वर साठे यांचे चिरंजीव अक्षय साठे आणि श्यामराव तुपे यांच्या पत्नी हौसाबाई तुपे यांना महापालिकेत नोकरी देण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी मृतांच्या वारसांसह शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी आयुक्त जाधव यांची भेट घेतली. येत्या दोन-तीन दिवसांत कामावर रुजू होण्याचे पत्र देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी मृतांच्या वारसांना दिले.(प्रतिनिधी)
मृतांच्या वारसांना मिळणार नोकरी
By admin | Published: October 17, 2015 12:59 AM