पिंपरी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून शिवसेना (उबाठा) पक्षात गेलेले राज्य संघटक एकनाथ पवार यांनी पुन्हा आज भाजपत प्रवेश केला आहे. नांदेड येथील भाजपाच्या एका विशेष कार्यक्रमात प्रवेश केला आहे.
विधानसभेत भाजप प्रणित महायुतीचे सरकार आल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर महायुतीमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत. लोहा कंधार मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेतील माजी सत्तारूढ पक्षनेते आणि शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवास शिवसेनेचे नेते कारणीभूत आहेत, अशी टीका पवार यांनी काही महिन्यापूर्वी केली होती व पक्ष सोडणार असल्याचे सूचित केले होते.
भोंडवेनंतर पवार यांनी सोडली शिवसेनेची साथ
चिंचवड विधानसभेत उमेदवारी मिळण्याच्या आशेने राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी शिवबंधन बांधले होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी युटर्न घेतला. 'मी मूळचा राष्ट्रवादीचाच राष्ट्रवादी अजित पवार गटातच आहे, असे जाहीर करून चर्चेला पूर्णविराम दिला होता. त्यापाठोपाठ शिवसेनेचे राज्य संपर्क नेते पवार यांनी शिवबंधन तोडून पुन्हा भाजप प्रवेश केला आहे.
नांदेड येथे झाला प्रवेश
नांदेड येथे पश्चिम महाराष्ट्र विभाग बैठकीदरम्यान विविध नेत्यांनी प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थित होते. एकनाथ पवार म्हणाले, 'माझा विधानसभेत पराभव कोणामुळे झाला. हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे मी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.'