Pimpri Chinchwad: सकाळपासून नुसतं फिरायचं, वेळ मिळेल तिथं खायचं..! आहार विस्कळीत, मात्र उमेदवार जपतायेत आरोग्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 05:01 PM2024-11-13T17:01:36+5:302024-11-13T17:02:12+5:30
उमेदवारांना मिळेल तिथे, असेल ते खायचे किंवा घरून डबा मागवायचा आणि मतदानाच्या दिवसापर्यंत तब्बेत जपायची, एवढेच त्यांच्या हातात आहे
नारायण बडगुजर
पिंपरी : विधानसभेसाठी पुढच्या आठवड्यात मतदान होणार असून, प्रचाराचा धुरळा उडत आहे. सभा, मेळावे, पदयात्रा, गाठीभेटींवर भर देण्यात येत आहे. प्रचारासाठी उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली आहे. या धावपळीत त्यांच्या पोटाची आबाळ होत आहे. त्यामुळे मिळेल तिथे, असेल ते खायचे किंवा घरून डबा मागवायचा आणि मतदानाच्या दिवसापर्यंत तब्बेत जपायची, एवढेच त्यांच्या हातात आहे.
महेश लांडगे : सकाळी सातला दिवस सुरू होऊन बिनसाखरेचा चहा घेतात. नाश्त्यात इडली, भाकरी घेतात. घरी आलेल्या नागरिकांशी नऊपासून संवाद साधतात. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांसोबत दुपारी दोनच्या सुमारास भाकरी, भरलेली वांगी, मिरची, पालेभाज्या असा शाकाहार घेतात. दुपारनंतर कोणाच्या घरी आग्रह झाल्यास कोरा चहा घेतात. रात्री कार्यकर्त्याच्या घरी किंवा कार्यालयात हलके जेवण घेतात. उशीर झाल्यास हळदीचे दूध घेतात.
अजित गव्हाणे : सकाळी सहाला दिवस सुरू होत असला तरी प्रचारामुळे सध्या जिम बंद आहे. सकाळी सातपासूनच घरी आलेल्या नागरिकांशी संवाद साधतात. त्यावेळी नाश्त्यात पोहे, उपमा किंवा थालीपीठ असते. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांसोबत मिसळ पावचाही आस्वाद घेतात. दुपारच्या जेवणात भाजी-भाकरी किंवा चपाती असते. सायंकाळी चहा-ब्रेड घेतात. रात्रीच्या जेवणाची निश्चित वेळ नाही. घरी गेल्यानंतर किंवा मिळेल तेथे रात्री हलका आहार घेतात.
सुलक्षणा शिलवंत : सकाळी साडेसहाला दिवस सुरू होतो. चहा किंवा काॅफी न घेता काश्मिरी ‘कावा’ घेतात. माॅर्निंग वाॅक करतानाच मतदारांशी संवाद साधतात. नाश्त्यात उसळ किंवा इडली-सांबार घेतात. दुपारी कार्यकर्त्यांसोबत जेवण घेतात. कार्यकर्ते किंवा कोणाच्याही घरी डाळभात, भाजी, पालेभाज्या असलेले जेवण घेतात. प्रचारासाठी फिरावे लागत असल्याने भरपेट जेवण टाळतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी घेतात.
भाऊसाहेब भोईर : सकाळी सातला दिवस सुरू होतो. कमी साखरेचा चहा घेतात. त्यानंतर चपाती-भाजीसह संतुलित शाकाहार घेतात. घराबाहेर पडल्यानंतर काहीही घेत नाहीत. प्रचारादरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी येतात. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत चहा घेतात. रात्री दहानंतर घरी परतल्यावर सूप किंवा हलका आहार घेतात. नाश्त्यामध्ये शनिवारी किंवा रविवारी मिसळ घेतात. घशाची काळजी म्हणून तेलकट पदार्थ टाळतात.
सुनील शेळके : सकाळी बिनसाखरेचा चहा आणि साधा नाष्टा घेतात. दुपारी प्रचारादरम्यान जेवणासाठी घरून डबा येतो. त्यात ज्वारीची भाकरी आणि भाजी असते. गोड पदार्थ टाळतात. गाठीभेटीदरम्यान कोणाच्या घरी गेले तर चहा घेतात. दुपारच्या जेवणानंतर ज्यूस घेतात. त्यात मोसंबी ज्यूस त्यांच्या आवडीचा आहे. दुपारनंतर कमी गोड असलेली शंकरपाळी चहासोबत घ्यायला आवडते. रात्री कार्यकर्त्यांच्या घरी जेवण घेतात.
दिवसभर केवळ दूध-चहा
बापूसाहेब भेगडे : सकाळी सहा वाजता दूध घेऊन दिवसाची सुरुवात करतात. घरी आलेल्या नागरिकांशी संवाद साधतात. नाष्टा न घेताच आठच्या सुमारास घराबाहेर पडतात. कार्यकर्त्यांच्या घरी गेल्यावर चहा घेतात. दिवसभर जेवण घेत नाहीत. रात्री घरून डबा येतो. ज्वारीची भाकरी, मिरचीचा ठेचा, झुणका, भाजी असते. सोमवारी आणि एकादशीला उपवास असतो. उपवासाला केवळ पाणी घेतात. गळ्यात तुळशी माळ असून शाकाहारी आहेत.
न्याहारी करूनच पडतात घराबाहेर
शंकर जगताप : सकाळी सात वाजता कमी दुधाचा चहा घेतात. घरी न्याहारीमध्ये ज्वारीची भाकरी, पालेभाजी, खजूर, भिजवलेले बदाम घेतात. दुपारी अडीचच्या सुमारास जेवणासाठी घरून डबा येतो. त्यात भाजी-भाकरी, डाळ, भात, फळे असतात. मटकीची भाजी, पनीर बुर्जी आवडते. प्रचारादरम्यान ज्यूस असतो. रात्रीही घरचा डबा कार्यकर्त्यांसोबतच शेअर करतात. उशीर झाल्यास जेवण टाळून दूध घेतात.