पिंपरी : कबड्डीत चमकदार कामगिरी करीत टप्प्याटप्प्याने यश संपादन केले. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान झाला. शासनाची वर्ग एकची नोकरीही मिळाली. त्यानंतरही कबड्डीवरील प्रेम कायम आहे. याच प्रेमापोटी बोपखेल येथील नितीन गोवर्धन घुले यांनी स्पोर्ट अॅकॅडमी सुरू करून खेळाडंूना दत्तक घेत कबड्डीसाठी घडविले जात आहे.
बोपखेल येथील नितीन घुले या खेळाडूला सुरुवातीपासूनच कबड्डीची आवड होती. चांगल्याप्रकारे सराव व्हावा यासाठी कांदिवली येथील स्पोर्ट्स अॅकॅडमी आॅफ इंडिया येथे सरावाला सुरुवात केली. सात ते आठ वर्षे सराव केला. विविध स्पर्धांत यश मिळाल्यानंतर रेल्वेत नोकरी मिळाली. कसून सराव करीत आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. यासह शिवछत्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. या यशामुळे त्यांना वर्ग १ची नोकरीही देण्यात आली. सध्या ते राज्य उत्पादनशुल्क विभागात अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.आपल्याप्रमाणेच इतरही खेळाडू घडले पाहिजेत यासाठी बोपखेल येथे चेतन घुले स्पोटर््स अॅकॅडमी सुरु केली असून, दहा खेळाडू दत्तक घेतले आहेत. खेळाडूंच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था येथे केली जात आहे. दरम्यान, निखिल घुले यांची प्रेरणा घेत येथे गावातील खेळाडूही सरावासाठी येत असतात. या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी नितीन घुले येथे येत असतात. नॅशनल, तसेच कुमार नॅशनल स्पर्धेत येथील खेळाडू खेळले आहेत. खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयार करण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. आपल्याप्रमाणेच इतरही खेळाडूंनी विविध स्पर्धांत यश संपादित करीत पदकांची कमाई करावी यासाठी ते प्रयत्नशील असतात.