पिंपरी : काळभोरनगर प्रभाग २६च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १० जानेवारीला मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव ध. मा. कानडे यांनी दिली. या संदर्भातील कार्यवाही महापालिकेच्या निवडणूक विभागाने सुरू केली आहे. काळभोरनगर प्रभागाचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा ३ सप्टेंबरला खून झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारांना दिनांक १५ ते २१ डिसेंबर या कालावधीत निवडणूक विभागाकडून नामनिर्देशन पत्र घेता येणार आहे. हे अर्ज सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत उपलब्ध असणार आहेत, तर दिनांक १५ ते २२ या कालावधीत अर्ज स्वीकारण्याची मुदत असणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. रविवारी नामनिर्देशन पत्रे दिली अथवा स्वीकारली जाणार नाहीत. दिनांक २३ डिसेंबरला सकाळी अकरापासून अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत दिनांक २८ डिसेंबरपर्यंत आहे. ३० डिसेंबरला चिन्हांचे वाटप होणार आहे. (प्रतिनिधी)
काळभोर प्रभागाची पोटनिवडणूक जाहीर
By admin | Published: December 10, 2015 1:13 AM