पवनानगर - बौर येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या कल्याणी राजू चव्हाण या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील शिक्षणाचे काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘परिस्थितीने शिक्षणाला ब्रेक’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध होताच कल्याणीच्या शिक्षणासाठी मदतीचे हात सरसावले असून, पुढील शिक्षणाचा मार्ग सोपा झाला आहे.कल्याणीचे आई व वडिलांचे छत्र लहानपणी हरपल्याने तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण तिचे मामा व भैरवनाथ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका क्षीरसागर यांनी पूर्ण केले. पुढील शिक्षण कसे होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, ‘परिस्थितीने शिक्षणाला ब्रेक’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करून त्यामध्ये कल्याणीची व्यथा मांडली. या बातमीची दखल घेऊन मावळ, पिंपरी-चिंचवड व अनेक ठिकाणांहून, शहरांमधून अनेक दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात आली आहे. या वेळी मायमाउली फाउंडेशन, कै. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाच्या वतीने व तळेगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, जनविकास प्रतिष्ठानाच्या नंदिनी दातार, संजय भुजबळ आदींनी तातडीने मदत केली. कल्याणी चव्हाण व तिच्या मामाने लोकमतचे आभार मानले.सुनील शेळके म्हणाले, ‘‘कल्याणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत जो काही खर्च लागेल तो करणार आहे. अशा ज्या विद्यार्थ्यांना आई-वडील नाही अशा अनेक गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना यापुढे मदत करण्यासाठी प्रयत्न करील.’’माझ्या परिस्थितीची खरी व्यथा लोकमतने मांडल्यामुळे मलामदत मिळाली आहे. त्यामुळे मला पुढील शिक्षण घेणे शक्य होणार असून, मी लोकमतचे व मला मदत करणाºया दानशूर व्यक्तींचे मनापासून आभार मानते.- कल्याणी चव्हाण, विद्यार्थिनी
कल्याणीसाठी सरसावले मदतीचे हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 2:17 AM