लोकमत न्यूज नेटवर्कचिंचवड : येथील प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात डॉ.वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनद्वारा आयोजित तीन दिवसीय संगीत महोत्सवाची सांगता रविवारी झाली. संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या प्रयोगाने रसिकांची मने जिंकली. नाद, स्वर, शब्द व अभिनयाचा सुरेख संगम करीत कलाकारांनी सादर केलेल्या कलेने महोत्सवाची रंगत वाढली.महोत्सवाचे यंदा सलग तिसावे वर्ष होते. सुरुवातीच्या दिवशी युवा कलाकारांनी सादर केलेल्या नृत्य, गायन, कथक, वादन व सहगायन कलागुणांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रयोगात कलाकारांनी संगीत रंगभूमीत रसिकांच्या मनाला वेड लावणाऱ्या भूमिका साकारत डॉ. वसंतरावांच्या अभिनयाला उजाळा दिला.भारतीय संगीतातल्या घराणे परंपरेचा विषय, संगीत, सरस अभिनय अशा सर्वांगाने हाताळून देखण्या झालेल्या नाटकाची पुन:प्रचिती या नाट्यप्रयोगातून रसिकांना मिळाली. प्रसिद्ध संवादिनीवादक पंडित जयराम पोतदार, डॉ. शिरीष गुळवणी, शैला गुळवणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी फाउंडेशनचे प्रभाकर लेले, नाना दामले, अरुण चितळे व इतर मान्यवर उपस्थित होते. महोत्सवात पूर्णवेळ उपस्थित राहणाऱ्या रसिकांपैकी एकास ‘रसिकराज पुरस्कार’ देण्यात येतो. या वर्षी हा पुरस्कार रसिक चंद्रकांत मांडले यांना देण्यात आला. कार्यक्रमासाठी विशेष कार्य करणाऱ्या अथर्व सुतार यास ‘नि:स्पृह कार्यकर्ता’ हा प्रातिनिधिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.वसंतरावांच्या गायकीचे गाढे अभ्यासक, गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी खॉँसाहेबांची भूमिका साकारली. डॉ. वंदना घांगुर्डे (झरीजा), संजीव मेहंदळे (सदाशिव), अस्मिता चिंचाळकर (उमा) यांच्या गायकीने रसिकांची मने जिंकली. संजय गोसावींनी पंडितजींची भूमिका बजावली. सुरांच्या बरसातीप्रमाणे संवाद, शब्दफेक व अभिनयाने अनंत कान्हे यांना रसिकांनी दाद दिली.दुर्वांकुर कुलकर्णी या छोट्या संगीत साधकाने छोट्या सदाशिवच्या भूमिकेस न्याय दिला.महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कलाकारांनी सादर केलेल्या कलेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवामध्ये गेले तीन दिवस अनेक कार्यक्रम घेण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी कलावंतांचा सत्कार केला. तसेच आभार मानले.
‘कट्यार काळजात घुसली’ने जिंकली मने
By admin | Published: May 09, 2017 3:37 AM