पिंपरी : गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे पावसाची अनिश्चितता आहे. त्यामुळे अल्प पर्जन्यमान झाल्यास दुष्काळ तर अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचे संकट ओढावू शकते. कोरोनापाठोपाठ या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडील आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क व सज्ज ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. . कोरोनापाठोपाठ या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडील आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क व सज्ज ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. राज्य कृषी पदवीधर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष गणेश बाबर, सचिव प्रकाश यादव, सातारा जिल्हाध्यक्ष नितीन निंबाळकर, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद यादव, जावळी तालुकाध्यक्ष विठ्ठल रांजणे,पाटण तालुकाध्यक्ष कृष्णा जाधव, वाई तालुकाध्यक्ष धनसिंग कदम, उपाध्यक्ष प्रवीण बाबर, खटाव तालुकाध्यक्ष किरण इंगळे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. राज्यातील धरणांमध्ये यंदा पुरेसा जलसाठा आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना धरणांतील जास्तीचा जलसाठा, पूर व अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. वित्त व जीवितहानी देखील झाली. पाळीव प्राणी, घर, शेतीचे नुकसान होऊन सर्व जीवनमान विस्कळीत झाले होते. राज्यातील काही भागांत अशाच पद्धतीने कमी अधिक फरकाने परिस्थिती असल्याचे दिसून येते. त्यामुळे यंत्रणेचे व्यवस्थापन आवश्यक आहे. परिणामी अशा संकटसमयी आवश्यक घटकाला पुरेशी मदत पोहच करणे शक्य होईल. तसेच सावधानता बाळगून संकटाची पूर्वकल्पना देता येईल. जेणेकरून नुकसान कमी होईल. त्यासाठी आपत्कालीन, मदत व पुनर्वसन विभाग, पोलीस, टास्क फोर्स ही सर्व यंत्रणा अधिक सतर्क व सज्ज करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संकटाशी लढताना या यंत्रणांवर ताण येत आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या संकटाच्या मुकाबल्यासाठी आणखी उपाययोजना करून यंत्रणेवरील ताण कमी करावा. जेणे करून यापुढे ओढावणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत या यंत्रणा सक्षमतेने कार्यान्वित होऊ शकतील, असे पत्रकात नमूद केले आहे.
पावसाळ्यात ओढावू शकते संकट; आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क, सज्ज ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 4:56 PM
अल्प पर्जन्यमान झाल्यास दुष्काळ तर अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचे संकट ओढावू शकते.
ठळक मुद्देराज्य कृषी पदवीधर संघटनेची मागणी