पिंपरी : शिवसेना-भारतीय जनता पक्षास विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांशी आघाडी केली. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे होते. विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांनी राजीनामा दिल्याने त्यावर शिवसेनेने दावा केला आहे. मात्र, हे पद शिवसेनेस मिळू नये, म्हणून सत्तारूढ राष्ट्रवादीकडून खेळी होत आहे.महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. २०१२च्या निवडणुकीत एकमुखी सत्ता आल्यानंतर काँगे्रसला १४, शिवसेनेला १४, भाजपाला ३ जागा मिळालेल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणास द्यायचे यावरील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा झाली होती. त्या वेळी भाजपा आणि शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळू न देण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परवानगीने राष्ट्रवादी संलग्न अपक्ष १० नगरसेवक आणि काँग्रेसचे १४ सदस्य अशी आघाडी करून समविचारी पक्ष म्हणून काँग्रेसला हे पद देण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेत गेली पावणेपाच वर्षे हे पद काँग्रेसकडे होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विराधी पक्षनेते राहुल भोसले यांच्यासह भाऊसाहेब भोईर यांचा गट राष्ट्रवादीत दाखल झाला. भोसले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदावर शिवसेनेने दावा केला आहे. या संदर्भात शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी महापौर शकुंतला धराडे यांना विरोधी पक्षनेते पदाबाबत पत्र दिले होते. (प्रतिनिधी)पक्षीय बलाबलानुसार विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेस मिळावे, याबाबत महापौरांना ३० डिसेंबरलाच पत्र दिले. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाहीही केली आहे. आता महापौरांनी विरोधी पक्षनेतेपद जाहीर करायचे आहे. मात्र, महापौर याबाबत टाळाटाळ करीत आहेत. कोणाच्या आदेशावरून टाळाटाळ करीत आहात.- सुलभा उबाळे
शिवसेनेला दूर ठेवण्याची खेळी
By admin | Published: January 04, 2017 5:21 AM