लोणावळा - आपल्या निसर्गरम्य सौंदर्याने लाखो पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा खंडाळ्यातील शूटिंग पॉर्इंट मागील दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा मोठा हिरमोड होत आहे. लोणावळा नगर परिषद प्रशासनाने तातडीने हा पॉईंट पुन्हा पर्यटकांकरिता खुला करण्याकरिता पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.पर्यटनाचे व थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यातील वलवण धरण व गार्डन नंतर खंडाळ्याचे वैभव असलेला शूटिंग पॉर्इंट दोन वर्षांपूर्वी अचानक बंद करण्यात आला. मुंबई व रायगड जिल्ह्यातील जीवघेण्या गरमीचा सामना करत घाट चढून आल्यानंतर खंडाळ्यातील निसर्गरम्य वातावरण व डोंगरदºया व व्हॅली पर्यटकांना साद घालतात. शूटिंग पॉर्इंट या ठिकाणावर अनेक सिनेमांचे चित्रीकरण झाले असून, या ठिकाणाहून राजमाची किल्ल्याचे विहंगम दृष्य पहायला मिळते. पावसाळ्यात समोरील काचळदरीतून वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. या ठिकाणाचा पर्यटनात्मक विकास साधण्याकरिता सदर जागेवर नेचर झोनचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. मात्र ही जागा अद्याप नगर परिषदेने ताब्यात घेतलेली नाही. मागील अनेक वर्षे पर्यटकांनी सदैव गजबजलेले हे ठिकाण दोन वर्षांपासून उंच उंच पत्रे लावत अचानक पर्यटकांकरिता बंद करण्यात आले आहे. तत्कालीन मुख्याधिकाºयांनी हे पर्यटनस्थळ नागरिकांकरिता खुले करावे, असे जागा मालकांना सांगितले होते. मात्र यावर अद्यापही कार्यवाही न झाल्याने हा पॉर्इंट आज अखेर बंदच आहे. लोणावळा नगर परिषदेने तातडीने हा पॉईंट पुन्हा पर्यटकांकरिता खुला करण्यास पावले उचलावीत, अशी मागणी शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे व स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष शौकत शेख यांनी केली.१खंडाळा शहराला निसर्गाचा मोठा वरदहस्त लाभला आहे. येथील मनमोहक सौंदर्य पाहण्यासाठी लोणावळ्यापेक्षा जास्त गर्दी होते. राजमाची पॉर्इंट, शूटिंग पॉर्इंट, सनसेट पॉर्इंट व खंडाळा तलाव परिसरात अनेक स्थानिक नागरिकांचे लहान-मोठे व्यवसाय आहेत. या सर्व ठिकाणांचा विकास केल्यास खंडाळ्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. शूटिंग पॉर्इंटलगत नगर परिषदेचा डीपी रस्ता आहे. हा रस्ता विकसित झाल्यास शूटिंग पॉर्इंटवर जाता येणार असल्याने नगर परिषदेने तातडीने हा डीपी रस्ता विकसित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. किरण गायकवाड यांनी केली आहे.२शूटिंग पॉर्इंटप्रमाणे लोणावळ्यातील वलवण धरण व उद्यानदेखील टाटा कंपनीने सुरक्षेच्या कारणावरून गत सात ते आठ वर्षांपासून बंद केले आहे. ते धरण, उद्यान तातडीने सुरू करावे, अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी टाटा कंपनीकडे केली आहे. लोणावळा खंडाळा परिसरातील एक एक पर्यटनस्थळे अशा प्रकारे बंद होऊ लागल्यास यथील पर्यटन व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याने तातडीने ही बंद केलेली पर्यटनस्थळे सुरू करावीत तसेच इतर पर्यटनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.
खंडाळ्याचा शूटिंग पॉर्इंट दोन वर्षांपासून बंदच, पर्यटकांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 3:21 AM