पिंपरी-चिंचवड : पेन घेण्यासाठी दुकानात गेलेल्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजता चिंचवड मधील क्विन्स टाऊन हौसिंग सोसायटी जवळ घडली होती. पोलिसांच्या सतर्कतेने अपहरण झालेल्या मुलीला सोडविण्यात तब्बल नऊ तासात पोलिसांना यश आले.
चिंचवड मधील उचब्रू समजल्या जाणाऱ्या या सोसायटीत राहणाऱ्या माही जैन (12) ही मुलगी पेन घेण्यासाठी सायंकाळी चार वाजता जवळच असणाऱ्या दुकानात गेली होती. पेन घेऊन परत येत असताना रस्त्यावर उभ्या असणाऱ्या सोनेरी रंगाच्या गाडीतील अज्ञात व्यक्तींनी तिला जबरदस्ती गाडीत ओढून घेतले. या वेळी माहीने आरडाओरडा केल्याने दुकानदार बाहेर आला. मात्र गाडी चालकाने गाडी दळवीनगरच्या दिशेने घेत पसार झाले. दुकानचालकाने गाडीचा पाठलाग केला मात्र गाडीचालक पसार झाल्याने त्याने ही बातमी सोसायटीतील सुरक्षारक्षक व रहिवाशांना दिली. यावेळी माहीचे आई-वडील नोकरीनिमित्त कामावर गेले होते. माहीचे मामा अलोक कटारिया यांनी पोलिसांकडे अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी यंत्रणा सतर्क करून शहर परिसरात नाका बंदी करत तपासाची चक्रे फिरविली. अपहरण कर्त्यांनी रात्री माहीच्या पालकांना संपर्क करून पैशांची मागणी केली. या फोनचा माग काढत पोलिसांनी हिंजवडी जवळील नेरे गावातून अपहरण कर्त्यांकडून मुलीची सुखरूप सुटका केली.
या घटनेत सत्यवान गजरमल (२५) राहणार मुळशी, नेरे (मुळगाव ,उस्मानाबाद) व त्याचा साथीदार जितेंद्र बंजारा (२१) राहणार थेरगाव,वाकड या दोघांना ताब्यात घेतले आहे. अपहरण झाल्यानंतर मुलीचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. जैन कुटुंबीय मुळचे राजस्थान मधील असून माहीचे आई-वडील आयटी कंपनीत कामास आहेत. माही काल शाळेतून स्कुल बसने घरी आली होती. मात्र घरात न जाता स्कुल बॅग इमारतीखाली असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या टेबल जवळ ठेऊन पेन घेण्यासाठी सोसायटीच्या बाहेर असणाऱ्या दुकानात पेन घेण्यासाठी गेली होती. यावेळी तिचे अपहरण करण्यात आले होते.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी सोशल मीडियावरून शहरात पसरली. परिसरातील विविध भागात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होते. रात्री उशिरा पर्यंत पोलीस शहर परीसरात कसून तपास करत होते. रात्री उशिरा माहीला सुखरूप पालकांच्या हवाली करण्यात आले. यावेळी जैन कुटुंबीयांनी व परिसरातील राहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांच्या कामगिरी बाबत कौतुक करून आभार व्यक्त केले.