पिंपरी : गळफास घेऊन २६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. त्याचा राग मनात धरून त्याच्या नातेवाईकांनी रिक्षाचालक तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण केली. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचोली येथे मंगळवारी (दि. २०) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली.
महेश देवेंद्र येमगड्डी (वय २२, रा. चिंचोली) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २१) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राजू लक्ष्मण देवरमणी (वय ४९), अक्षय शिवराज देवरमणी (वय २४), शिवराज लक्ष्मण देवरमणी (वय ५८), वैभव सुरेश नाईक (वय ३०), दीपक दिलीप सौदे (वय ३७) यांना अटक केली. त्यांच्यासह कुणाल कटारे (सर्व रा. देहूरोड) याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी येमगड्डी हे रिक्षाचालक आहेत. गेल्या काही दिवसांपासून इतर प्रवाशांसह काही तृतीयपंथी देखील फिर्यादीच्या रिक्षातून दररोज प्रवास करीत होते. यात आशिष देवरमणी (वय २६) हे देखील प्रवास करायचे. त्यातून आशिष आणि फिर्यादी येमगड्डी यांच्यात मैत्री झाली.
दरम्यान, रिक्षा नादुरुस्त झाल्याने फिर्यादी हे रिक्षा घेऊन जाऊ शकले नाहीत. त्यानंतर आशिष यांनी सोमवारी (दि. १९) गळफास घेऊन आत्महत्या केली. याचा राग मनात धरून आशिष यांचे नातेवाईक व आरोपी हे फिर्यादीच्या घरी आले आणि फिर्यादीला रिक्षामध्ये जबरदस्तीने बसविले. तुझ्यामुळे आमचा आशिष गेला, तुला जीवंत सोडत नाही. तुझा मर्डरच करतो, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला जबर मारहाण केली. तसेच फिर्यादीला जीवे मारण्यासाठी सुरा मारला. मात्र फिर्यादीने तो चुकवला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला सेन्ट्रल चौक, देहूरोड येथे रीक्षातून रस्त्यावर ढकलून देऊन सोडून निघून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद दळवी तपास करीत आहेत.
संशयातून उचलले टोकाचे पाऊल?आशिष देवरमणी आणि रिक्षाचालक असलेले फिर्यादी येमगड्डी यांच्यात मैत्री होती. मात्र, येमगड्डी रिक्षा घेऊन जाऊ न शकल्याने आशिष यांचा गैरसमज झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. फिर्यादी येमगड्डी हे इतर कोणाशी तरी मैत्री करतील, असा संशय येऊन आशिष यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.