पिंपरी : उसन्या पैशाच्या कारणावरून तरुणाला मारहाण करून त्याचे अपहरण केले. याप्रकरणी ११ मार्चला गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अपह्रत तरुणाची सुटका केली. तसेच तडीपार गुंडासह दोन जणांना अटक केली.
राहूल संजय पवार (वय ३१, रा. महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) आणि नितीन पोपट तांबे (वय ३२, रा. तांबेवस्ती, निमगाव-दावडी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रोहताशकुमार चौधरी (रा. राजे शिवाजी नगर, चिखली) असे सुटका केलेल्या अपहृत तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने एमआयडीसी भोसरी पालीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे आरोपींनी अपहरण केले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एमआयडीसी भोसरी पोलिसांची विविध पथके तयार केली होती. दरम्यान, पोलीस कर्मचारी संजय जरे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी किरकटवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथे छापा घालून अपहृत चौधरी यांची सुटका केली. तसेच दोन जणांना अटक केली. उसने पैसे देण्याच्या कारणावरून आरोपींनी चौधरी यांचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी राहूल पवार याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न तसेच इतर गुन्हे दाखल असल्याने त्यास दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे. मात्र तडीपारीच्या आदेशाचा भंग करून तो शहरात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस कर्मचारी संजय जरे, गणेश बोऱ्हाडे, रवि नाडे, नितीन खेसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.