पिंपरी : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात कडप्पा फरशी मारून तिचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली. ही घटना सोमवारी (दि. १) पहाटे तीनच्या सुमारास उघडकीस आली.
ललिता रमेश पुजारी (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. रमेश हनुमंत पुजारी (वय ३५, रा. काळाखडक, वाकड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी श्रीकांत चंद्रकांत गायकवाड यांनी याप्रकरणी सोमवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश पुजारी हा त्याची पत्नी ललिता हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार भांडण करून मारहाण करत होता. त्याने सोमवारी पुन्हा पत्नी ललिता हिच्याशी भांडण केले. त्यावेळी तिच्या डोक्यात कडप्पा फरशी मारली. यात ललिताचा मृत्यू झाला. खून प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी रमेश पुजारी याला अटक केली.