पिंपरी : किरकोळ कारणावरून चौघांनी एका तरुणाच्या छातीमध्ये चाकू खूपसून गंभीर जखमी केले. तसेच तरुणाच्या भावासह वडिलांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी येथे मंगळवारी (दि. १५) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.
संतोष बाळू गायकवाड (वय २२), कार्तिक, शाहिद साजीद शेख, शाहनवाज साजीद शेख (वय १८, सर्व रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी संतोष गायकवाड आणि शाहनवाज शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली. किसन शंकर पवार (वय ४२, रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादीचा मुलगा अमोल (वय २०) असे चाकू लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे साडू पांडूरंग सर्जेराव डिकोळे आणि आरोपी यांच्यात बाचाबाची होऊन वाद झाला होता. यात डिकोळे यांना मारहाण झाल्याने त्यांना पाहण्यासाठी फिर्यादी आणि त्यांची मुले अमाले व सूरज हे तिघे जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांची मुले अमोल व सूरज यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी व दगडांनी मारहाण केली.
'रुक तेरे को खतमीच कर देता, असे आरोपी शाहनवाज शेख हा अमोल याला म्हणाला. त्यानंतर अमोलच्या छातीच्या मधोमध चाकू खूपसून परत काढून डाव्या बाजूला पोटात खुपसत असताना चाकू जर्किनमध्ये अडकून राहिला. छातीतून रक्त येत असल्याने अमोल खाली पडला. त्यास गंभीर जखमी करून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे नागरिकांनी घराचे दरवाजे बंद केले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. आरोपींनी अमोलच्या छातीत चाकू खूपसून त्याला जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, फिर्यादी किसन पवार यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी तपास करीत आहेत.