पुणे : नाट्यरसिक आणि रंगकर्मींसाठी एक खूशखबर! शहराच्या उपनगरीय भागात नाट्य परिषदेची एखादी शाखा असावी, या रंगकर्मी आणि रसिकांच्या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाकडून उपनगरीय शाखा निर्मितीला ‘हिरवा कंदील’ मिळाला असून, येत्या मे महिन्यामध्ये’ कोथरूड’सारख्या गजबजलेल्या भागात परिषदेची उपनगरीय शाखा सुरू होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहराचे झपाट्याने विस्तारीकरण झाल्यामुळे नाट्यसंस्कृतीशी जोडला गेलेला कलाकार आणि अभिरूचीसंपन्न प्रेक्षक ठिकठिकाणी विखुरला गेला आहे. मध्यवर्ती पेठांमधील नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे लांब अंतरावरील प्रेक्षकांना नाटकांपासून वंचित रहावे लागते, ही गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने उपनगरांमध्ये नाट्यगृह उभारणीचे सकारात्मक पाऊल उचलण्यात आले, त्यामुळे हडपसर, पदमावती, या भागांना नाट्यगृहे मिळू शकली. नाट्यपरिषदेनेही आपली कार्य कक्षा रूंदावून एखादी उपनगरीय शाखा सुरू करावी अशी नाट्य रसिक आणि परिषदेच्या सदस्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती, त्याप्रमाणे धनकवडी परिसरात उपनगरीय शाखा सुरू करण्याच्या प्रयत्नही झाला. मात्र अपुऱ्या सदस्य संख्येमुळे ही शाखा बंद पडली. परंतु आता कोथरूडमध्ये उपनगरीय शाखा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले असून, नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये शाखा निर्मितीला मान्यता मिळाली असल्याची माहिती नियामक मंडळाचे सदस्य सुनील महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. कोथरूड हा अत्यंत मोठा आणि गजबजलेला भाग आहे. कोथरूडसह, औंध, चांदणी चौक भागातील लोकांना वहातूक कोंडीमधून मार्ग काढीत टिळक रोडच्या शाखेमध्ये येणे शक्य होत नाही. त्यामुळे कोथरूडमध्येच एखादी शाखा सुरू का केली जात नाही? अशी विचारणा झाली आणि त्याचा गांभिर्याने विचार करून नियामक मंडळापुढे याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि त्याला मान्यता मिळाली. (प्रतिनिधी)
‘कोथरूड’ शाखा सुरू होणार
By admin | Published: April 06, 2016 1:13 AM