पिंपरी : मोबाईलचे हप्ते का भरत नाही, असे विचारल्याच्या रागातून तीन जणांनी एकावर कोयत्याने वार केले. तसेच सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली. तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर येथे मंगळवारी (दि. २८) हा प्रकार घडला.
विशाल नंदकिशोर खंदारे (वय २४, रा. तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी बुधावरी (दि. २९) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मयुर अंकुश मते (वय ३१, रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे), स्वप्नील उर्फ मोन्या आनंद जाधव (रा. वराळे फाटा, ता. मावळ), गणेश उर्फ सौरभ आनंद जाधव (वय २२, रा. वराळे फाटा, ता. मावळ) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यात मयुर मते आणि गणेश जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर मते याने फिर्यादी यांच्या नावावर हप्त्याने मोबाईल घेतला होता. मात्र, मते याने मोबाईलचे हप्ते भरले नाही. मोबाइलचे हप्ते का भरत नाही, असे फिर्यादीने विचारले. याचा राग मनात ठेवून मते याने दोन साथिदारांसह दुचाकीवरून येऊन फिर्यादीला शिवीगाळ केली. मी हप्ते भरणार नाही, तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली. तसेच लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केला.
फिर्यादी जखमी होऊन खाली पडले असता आरोपींनी कोयता उलटा आणि सरळ धरून फिर्यादीवर पुन्हा वार केले. स्टेशन रस्त्यावर हे भांडण सुरू होते. या रस्त्यावरून येणारे-जाणारे लोक व प्रवासी हे भांडण पाहून घाबरले आणि सैरावैरा पळाले. आरोपींनी हातातील कोयता हवेत फिरवत सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.